कुडाळ : प्रतिनिधी – मुंबई-गोवा महामार्गावर बेकायदा दारू वाहतूक करणाऱ्या डंपरवर कुडाळ पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल २४ लाख २० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत १४ लाख२० हजाराची गोवा बनावटीची दारू, १० लाख रुपयांचा डंपर आणि एक धारदार कोयता जप्त करण्यात आला. डंपरचा चालक घटनास्थळावरून फरार झाला असून, या प्रकरणी विविध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. २८) रात्री मुंबई-गोवा महामार्गावरील बिबवणे येथे पोलिसांनी गोव्याहून कुडाळच्या दिशेने येणाऱ्या MH 07 C 6737 क्रमांकाच्या डंपरला थांबविण्याचा इशारा दिला. मात्र चालकाने पोलिसांचा इशारा धुडकावून लावत भरधाव वेगाने वाहन पळविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तत्काळ पाठलाग करून पिंगुळी-टेंबधुरीनगर येथे डंपर अडवला. मात्र, त्यानंतर चालक घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला.
यानंतर पोलिसांनी डंपरची तपासणी केली असता, त्यामध्ये विविध ब्रँडच्या गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्यांचे बॉक्स बेकायदा वाहतूक करत असल्याचे आढळून आले. तसेच वाहनातून एक धारदार कोयताही जप्त करण्यात आला.
या कारवाईत सुमारे १४.२० लाख रुपयांचा अवैध दारूसाठा, १० लाख रुपयांचा डंपर आणि एक धारदार कोयता असा एकूण २४ लाख २० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई कुडाळचे प्रभारी पोलीस निरीक्षक जयदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने केली. याप्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, भारतीय न्याय संहिता (BNS), मोटार वाहन कायदा, शस्त्र अधिनियम तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत चालकासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार चालकाचा शोध कुडाळ पोलीस घेत आहेत.













