गोवा येथून नेपाळकडे जाणाऱ्या खाजगी बस मधील घटना
आंबोली । प्रतिनिधी : गोवा येथून नेपाळला जाणाऱ्या एका खासगी बसमधील एका प्रवाशाचा आंबोली घाटात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली. बलबहादूर कालीबहादूर खडका (वय ५४, रा. डाडागांव, ७ सल्लान, नेपाळ) असे मृत प्रवाशाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की गोवा येथून नेपाळकडे जात असलेली खाजगी बस क्रमांक (एमएच १३ पी १९७९ ) मध्यरात्री दीडच्या सुमारास बस आंबोली घाटात आली असता, प्रवासी बलबहादूर खडका यांना अस्वस्थ वाटू लागले. बसमधील इतर प्रवाशांनी तातडीने आंबोली पोलीस दूरक्षेत्र येथे माहिती दिली. त्यानंतर त्यांना तात्काळ आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश जाधव यांनी तपासणी केली असता, खडका यांचा वाटेतच मृत्यू झाल्याचे घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच आंबोली पोलीस दूरक्षेत्राचे ठाणे अंमलदार लक्ष्मण काळे आणि हवालदार दीपक शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पंचनामा करून प्राथमिक आरोग्य केंद्रात आवश्यक माहिती जमा केली आणि इनक्वेस्ट पंचनामा केला. मृताचे नातेवाईक गोव्याहून आंबोलीकडे निघाले असून, ते पोहोचल्यानंतर पुढील प्रक्रिया केली जाईल.
*ओरोस जिल्हा रुग्णालयात होणार शवविच्छेदन*
बलबहादूर खडका हे नेपाळचे नागरिक असल्याने त्यांचे शवविच्छेदन ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात होणार आहे. मृतदेह त्यांच्या देशात नेण्यासाठी फॉरेन्सिक रिपोर्ट आणि तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली शवविच्छेदन होणे आवश्यक असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आंबोली पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.












