शिवसेना चिपळूणतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना

 युनेस्कोच्या मान्यतेनंतर शिवसैनिकांनी साजरा केला ऐतिहासिक गौरव

चिपळूण (प्रतिनिधी) : युनेस्कोने छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा ऐतिहासिक किल्ल्यांचा जागतिक वारसा यादीत समावेश करून महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाला जागतिक पातळीवर मान्यता दिली आहे. ही अभिमानास्पद घटना प्रत्येक मराठी माणसासाठी गौरवाचा क्षण ठरली आहे. या ऐतिहासिक विजयाचा आनंद व्यक्त करण्यासाठी शिवसेना चिपळूण यांच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमात महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख सौ. रश्मी गोखले, तालुकाप्रमुख संदेश आयरे, शहरप्रमुख उमेश सकपाळ, महिला आघाडी शहरप्रमुख प्राजक्ता टकले, माजी उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे, माजी नगरसेवक महंमद फकीर, करामत मिठागरी, युवासेना शहरप्रमुख विनोद पिल्ले तसेच शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान ‘जय भवानी, जय शिवाजी’ च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतीस साश्रू अभिवादन करत युनेस्कोच्या निर्णयाचे स्वागत केले. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक वैभवाला जागतिक व्यासपीठावर स्थान मिळाल्याबद्दल शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.