चिपळूण (प्रतिनिधी) : बदलत्या गतीमान शैक्षणिक प्रवाहात कोकणातील विद्यार्थी पाय रोवून उभा रहायला हवा असेल तर त्याच्या अध्ययन प्रक्रियेला अत्याधुनिक साधन उपलब्धतेची, नव्या तंत्रज्ञानाची जोड मिळायला हवी. यासाठी कालमानानुसार शिक्षणाचे प्रगत साधन म्हणून पुढे आलेल्या इन्टॉक्टिव्ह डिजिटल बोर्डचा वापर करून विद्यार्थ्यांची आकलन शक्ती अधिक प्रगल्भ करण्याकरिता चतुरंग प्रतिष्ठानने स्मार्ट पाऊल उचलले असून प्रारंभिक टप्प्यात चार शाळांना प्रत्येकी दीड लाख रूपयांचे हे ई लर्निंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे येत्या काही वर्षात ३० शाळांमध्ये हे स्मार्ट पाऊल टाकण्याचा मनोदय चतुरंगतर्फे व्यक्त करण्यात आला आहे.
चिपळुणातील युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये नुकताच हा औपचारिक अनावरण समारंभ झाला. या प्रशालेसह खेड तालुक्यातील सद्गुरू काडसिद्धेश्वर विद्यालय गुणदे, गुहागर तालुक्यातील दुर्गाबाई हरी माध्यमिक विद्यालय अंजनवेल आणि चिपळूण तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल वहाळ या चार विद्यालयांमध्ये ही स्मार्ट शिक्षण पद्धती सुरू करण्यात येत असल्याची उद्घोषणा या कार्यक्रम निमित्ताने करण्यात आली. याचे अनावरण समाजसेवी विचारवंत व प्रख्यात डॉ. मिलिंद गोखले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांच्या सोबत परशुराम एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष मकरंद जोशी व अध्यक्ष हेमंत भागवत यांची प्रमुख उपस्थिती होती. चतुरंगने स्मार्ट स्टडी स्कील स्कीम नवउपक्रमाचा संकल्प सोडला. यानंतर आज चार शाळांमध्ये या अत्याधुनिक साधनसेवेचा प्रारंभ केला असून येत्या तीन-चार वर्षात सुमारे तीस शाळांमधून असे स्मार्ट बोर्ड बसविण्याचे ध्येय धोरण चतुरंग प्रतिष्ठानचे असल्याचे चतुरंगतर्फे इंद्रायणी दीक्षित यांनी प्रास्ताविकात सांगितले. या उपक्रमाला भगीरथ प्रतिष्ठान व कॉटन किंग यांचे भक्कम अर्थपूर्ण आधार लाभल्याचा कृतज्ञ उल्लेख नितीन दीक्षित यांनी केला.
यावेळी चारही विद्यालयाचे शिक्षक, मुख्याध्यापक व संस्था अध्यक्ष पदाधिकारी यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमानंतर या बोर्डाचा वापर व अध्यापन यासंदर्भात प्रशिक्षण ठेवण्यात आले होते. यु. इं. स्कूलचे मुख्याध्यापक विभाकर वाचासिद्ध यांनी डॉ. गोखले व चतुरंग प्रतिष्ठान यांना कृतज्ञतापूर्वक सन्मानचिन्ह व पुस्तिका दिली. सुमारे सहा लक्ष रूपयांच्या या लक्षणीय कार्यक्रमानिमित्ताने एक स्मार्ट सोहोळा चिपळूणकर शिक्षणप्रेमींना सुखावून गेला.
चौकट-
बोर्डातला स्मार्टनेस विद्यार्थ्यांत या स्मार्ट शिक्षणाची आवश्यकता चतुरंग प्रतिष्ठानने का केली याचा किस्सा डॉ. मिलिंद गोखले यांनी सांगितला. ते म्हणाले की, सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्काराच्या ग्रुप मुलाखतींसाठी परीक्षक म्हणून झारापचे प्रसिद्ध समाजसेवक डॉ. प्रसाद देवधर, चिपळूणच्या पोलीस अधिकारी रमा करमरकर आणि ते स्वतः परिक्षक म्हणून काम करीत होते. ज्या शाळांनी अशा बोर्डचा वापर केला, ती सामान्यज्ञानात अधिक स्मार्ट व एकूणच सामान्यज्ञानात खूपच पुढे असलेली दिसल्याचे मत समितीने नोंदविले व अशा इन्स्ट्रॉक्टिव्ह डिजिटल बोर्डची गरज वर्तवली होती. ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्तेत कमी नव्हती. तर तंत्रज्ञानाचा अभाव होता. एखादी संकल्पना दृकश्राव्य पद्धतीने अवगत केल्यानंतर त्याचे होणारे आकलन सर्वंकष असते. त्या संदर्भात कोणत्याही पद्धतीने प्रश्न आल्यास परिपूर्ण उत्तर देता येणे शक्य होते.












