खनिज चोरी कारवाईसाठी साईप्रसाद कल्याणकर यांचे आत्मक्लेश उपोषण सुरू

प्रशासनाची पाठ : स्थानिकांच्या संतप्त प्रतिक्रिया

बांदा : प्रतिनिधी
बांदा – सटमटवाडी परिसरातील सीमा तपासणी नाका येथे सन २०१९ मध्ये करण्यात आलेल्या उत्खननातून सुमारे २७ हजार ब्रास माती अवैधरित्या भरावासाठी नेण्यात आली होती. यासंदर्भात खनिज चोरीचा ठपका ठेवला असून तत्कालीन तहसीलदारांनी केवळ नोटीस काढून प्रकरण दाबल्याचा आरोप साईप्रसाद कल्याणकर यांनी केला होता. संबंधितांवर कारवाई होण्यास विलंब होत असल्याने आजपासून श्री. कल्याणकर यांनी बांदा तलाठी कार्यालयासमोर आत्मक्लेश उपोषण केले. मात्र, प्रशासनाने या उपोषणाकडे पाठ फिरवली. त्यामुळे स्थानिकांकडून प्रशासनाविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.

या प्रकरणात सरकारचे अंदाजे १३९ कोटी रुपये व त्यावरील व्याजाचा मोठा आर्थिक नुकसान झाल्याचे म्हटले आहे. गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करूनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. तहसीलदार श्रीधर पाटील यांनीही दुर्लक्ष केल्याचा आरोप श्री. कल्याणकर यांनी केला.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी श्री. कल्याणकर यांची आहे. सकाळी १० वाजता उपोषणास प्रारंभ करूनही संध्याकाळी उशिरा ६.३० वाजेपर्यंत महसूल प्रशासनाचा एकही अधिकारी आले नव्हते. वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन सारंग यांनी सायंकाळी उशिरा वैद्यकीय तपासणी केली.

हा केवळ आर्थिक गैरव्यवहार नसून शासनाच्या संसाधनांची खुली लूट केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी होऊन शासकीय महसूलाची वसुली करण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी कल्याणकर यांनी केली आहे. उपोषण अद्यापही सुरू असून ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही, असे श्री. कल्याणकर यांनी सांगितले.