लालबहादूर शास्त्री हायस्कूल, दहागाव मंडणगड येथे माजी विद्यार्थ्यांच्या मंचाच्या वतीने आयोजित एस.एस.सी गुणवंत विद्यार्थी सन्मान २०२५ व स्व. तानाजी अभंग आदर्श विद्यार्थी सन्मान या वार्षिक उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते श्री. उत्तमकुमार जैन आणि ॲड. विनोद दळवी उपस्थित होते.
या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्री. उत्तमकुमार जैन म्हणाले, “विद्यार्थ्यांनी जुन्या परिभाषेत प्रगती मोजू नये, तर अचूकतेचा ध्यास घेत संगणक युगातील स्पर्धांमध्ये यश मिळवावे.” त्यांनी आत्मविश्वास आणि प्रयत्नांची महत्त्व पटवून देत शहरी आणि ग्रामीण जीवनातील साम्यस्थळांचा संदर्भ देत विद्यार्थ्यांना प्रेरित केले. या कार्यक्रमात शालांत परीक्षेत गुणवत्तापूर्वक यश मिळवलेल्या कु. श्रेयस प्रमोद जाधव (गाव – मुगीज) याला स्व. तानाजी अभंग आदर्श विद्यार्थी सन्मान पुरस्कार देऊन शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह आणि रोख ₹५,०००/- देऊन गौरवण्यात आले. तसेच कु. कौस्तुभ भरत मोरे (दहागाव) याने २०२४-२५ शैक्षणिक वर्षात महाराष्ट्रात तिसरा क्रमांक मिळवल्याबद्दल विशेष सन्मान देण्यात आला.
या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. तसेच सूत्रसंचालन श्री. सुभाष दळवी यांनी तर प्रस्तावना श्री. महेंद्र सावंत यांनी केली. शालेय विद्यार्थिनींनी सुमधुर स्वागत गीत सादर करून कार्यक्रमाला सुरुवात केली. यावेळी सरपंच, माजी शिक्षक, पालकवर्ग, शाळेचे मुख्याध्यापक श्री. विजय खाडे, आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे ॲड. विनोद दळवी यांनी मंचाच्या शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. उत्तमकुमार जैन यांनी मंचाच्या नियोजनबद्ध कार्याची प्रशंसा करत, “या उपक्रमाचा भाग व्हायला मला नक्कीच आवडेल,” असे उद्गार काढले. मंचाचे अध्यक्ष श्री. दीपक गोरीवले यांनी मान्यवरांचे आभार मानत कार्यकारिणीच्या वतीने सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये संदिप सुखदरे, नंदिनी दळवी-पाटणकर, सुर्यकांत खेराडे, नंदकुमार दळवी, समीर खोचरे, दिलीप मराठे, नरेश चव्हाण यांचा मोलाचा सहभाग होता. शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली.










