सावंतवाडी । प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (MSCERT) शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून कुणकेरी शाळा क्रमांक १ चे उच्चश्रेणी मुख्याध्यापक, साहित्यिक विठ्ठल नारायण कदम यांच्या ‘चिमणकथा’ या बालकथा संग्रहाची अभ्यासक्रमात निवड केली आहे. शासनामार्फत राबवण्यात आलेल्या ग्रंथनिर्मिती उपक्रमांतर्गत या संग्रहाची निर्मिती करण्यात आली आहे, ज्याचा उद्देश शालेय विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची रुची वाढवणे हा आहे.
‘चिमणकथा’ हा चाळीस बालकथांचा संग्रह असून तो मुलांच्या भावविश्वावर आधारित आहे. या पुस्तकात चिमण नावाचा मुलगा नायक असून, त्याच्या सभोवतालचे जग आणि त्याचे निरीक्षणे तो पालक, शिक्षक आणि मित्र यांच्याशी संवाद साधताना मांडतो. हा ग्रंथ महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या ग्रंथालयांमध्ये दाखल झाला असून, शिक्षक आणि विद्यार्थी वर्गाकडून त्याचे स्वागत होत आहे.
विठ्ठल कदम हे एक प्रसिद्ध साहित्यिक आहेत. यापूर्वी त्यांचे ‘एकदा काय झाले?’ हा कथासंग्रह, ‘चार पावलं दूर’ ही बालकादंबरी आणि ‘तुझा पदर तिरंगा’ हे बालसाहित्य प्रकाशित झाले आहे. तसेच, त्यांचा ‘रुमणी’ हा काव्यसंग्रह साहित्य प्रांतात गाजलेला आहे. कदम हे महाराष्ट्र शासनाच्या साहित्यिक व सांस्कृतिक मंडळावर सदस्य असून, त्यांनी अनेक नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबवले आहेत.
याच उपक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मनोहर परब आणि रामजी पोळजी यांचीही पुस्तके प्रकाशित करण्यात आली आहेत. विठ्ठल कदम यांच्या ‘चिमणकथा’ या संग्रहाची अभ्यासक्रमात निवड झाल्याने बालसाहित्य क्षेत्राला प्रोत्साहन मिळेल आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार वाचनाची संधी उपलब्ध होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.












