त्यात कोणताही राजकीय हेतू नाही- कोत्रेवाडी नागरिक
लांजा (प्रतिनिधी) डम्पिंग हटाव हा आमच्या अस्तित्वाचा लढा आहे. त्यात कोणताही राजकीय हेतू नसून आमच्या न्याय हक्कांसाठी तो आम्ही पुकारलेला आहे. आणि जोपर्यंत डम्पिंग रद्द होत नाही तोपर्यंत आमचा लढा हा असाच कायम चालू राहिल. कोणी कितीही आमिषे दाखवली तरी आम्ही आमच्या निश्चयापासून ढळणार नाही, अशी रोखठोक भूमिका कोत्रेवाडी येथील नागरिकांनी घेतली आहे.
दरम्यान, लांजा नगरपंचायत प्रशासन नागरिकांच्या संयमाचा बांध फुटण्याची वाट पाहत आहे का? असा सवाल करतानाच यातूनच भविष्यात काही प्रकार घडला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ही लांजा नगरपंचायत प्रशासनावर राहील, असा इशारा कोत्रेवाडी नागरिकांच्या वतीने देण्यात आला आहे.
लांजा नगरपंचायतीच्या वतीने कोत्रेवाडी येथे वाडीवस्ती लगत डम्पिंग ग्राउंड प्रकल्प प्रस्तावित आहे. लगतच असणारी वस्ती, सार्वजनिक पाण्याच्या विहिरी यामुळे भविष्यात या ठिकाणी रोगराई वाडून लोकांचे जीवनमान बिघडणार आहे .वाडीवस्ती बाधित होणार असून भावी पिढीला देखील धोका निर्माण होणार आहे. आणि म्हणूनच कोत्रेवाडी येथील नागरिकांच्या वतीने गेल्या चार वर्षांपासून डम्पिंग ग्राउंड विरोधात संघर्षाचा लढा पुकारण्यात आलेला आहे.हा लढा कोणत्याही राजकीय हेतूने सुरू केलेला नसून आंदोलनात कोणतीही बाहेरील व्यक्ती देखील सहभागी झालेली नाही.तसेच वाडीबाहेरील व्यक्तींकडून स्थानिक नागरिकांना चिथावणी देण्याचा प्रयत्न देखील झालेला नाही. केवळ नगरपंचायतीच्या गळचेपी धोरणा विरोधातच नागरिकांनी आपला लढा पुकारलेला असल्याचे नागरिकांनी स्पष्ट केले आहे.
यापूर्वी नागरिकांनी केलेल्या उपोषण, आंदोलनालालांजा तालुका भाजपा, काँग्रेस या पक्षांनी देखील पाठिंबा दिला होता. तर दिनांक ८ जुलै रोजी छेडलेल्या लाक्षणिक उपोषणाला शिवसेनेने देखील पाठिंबा दिला होता. अशाप्रकारे कोत्रेवाडी ग्रामस्थांनी अन्यायाच्या विरोधात छेडलेल्या या आंदोलन उपोषणाच्या लढ्याला वेळोवेळी अन्यायविरुद्ध लढणाऱ्या पक्षांनी नेहमीच पाठिंबा दिलेला आहे.
असे असले तरी नागरिकांच्या या डम्पिंग हटाव आंदोलन, उपोषणाकडे नगर पंचायत प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे का? नागरिकांनी पुकारलेल्या उपोषणाला उत्तर देण्यासाठी नगरपंचायत प्रशासन सामोरे का येत नाही? येथील अधिकाऱ्यांवर कोणता दबाव आहे का? अशा प्रकारचे संभ्रम लोकांच्या मनात यामुळे निर्माण झालेले आहेत. हा लढा स्थानिक जनतेचा असल्याने तो राजकीय लढा असण्याची सुताराम शक्यता नाही. त्यामुळे प्रशासनाची देखील दिशाभूल करू नये, असे कोत्रेवाडी नागरिकांचे म्हणणे आहे.
अन्य ठिकाणी टाकलेल्या कचऱ्यामुळे तेथील नागरिकांना त्रास होतो म्हणून लांजा नगरपंचायत प्रशासन त्याची तात्काळ दखल घेऊन कार्यवाही करण्याचे पत्र देते. मात्र कोत्रेवाडी येथे वाडी वस्ती लगत नियोजित डम्पिंग ग्राउंड प्रकल्प राबवला जात असताना आणि लोकांचा त्याला सातत्याने विरोध असताना नगरपंचायत प्रशासन मात्र त्याकडे जाणीवपूर्व दुर्लक्ष करते. आंदोलने उपोषण करूनही प्रशासन समोर येत नाही. यामधील नेमके काय दडले आहे? असा सवाल देखील कोत्रेवाडी नागरिकांनी उपस्थित केला आहे .
आठ जुलै रोजी नागरिकांनी छेडलेल्या लाक्षणिक उपोषणाला उत्तर देण्यासाठी नगरपंचायतीचा एकही सक्षम अधिकारी त्या ठिकाणी येऊ शकला नाही. त्यामुळे लोकांच्या प्रश्नाचे उत्तर प्रशासनाकडे नाही का? असा सवाल देखील नागरिकांनी उपस्थित केला आहे.
कोत्रेवाडी नागरिकांनी पुकारलेल्या आंदोलन, उपोषणाला जर सामोरे जाता येत नसेल, त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देता येत नसतील तर नगरपंचायत प्रशासनाच्या संबंधित सक्षम अधिकाऱ्यांनी एक तर हा डंपिंग ग्राउंड प्रकल्प स्थलांतरित किंवा रद्द करीत असल्याचे लेखी पत्र आम्हाला द्यावे, अशी मागणी देखील कोत्रेवाडी नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे.









