पावसाची लपा-छपी, कोकण चिंतेत…!

वार्तापत्र -कोकण संतोष वायंगणकर.

पावसाच्या या शिडकाव्याने कोकणातील शेतकरी काहीसा सुखावला, म्हणजे भाताची ‘जीव जगवणी’ झाली असं त्याला वाटू लागलं. आणि परत पाऊस गायब झाल्याने विहिरीच्या, नदीच्या पाण्याने शेती शिपून भात जिवंत ठेवण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला. पुन्हा एकदा पाऊस गायब झाला. आता कुठे गेले दोन दिवस पाऊस थोडावेळ हजेरी लावतोय अनेक भागांमध्ये कडक उन्हामुळे शेतामध्ये भेगा पडल्या आहेत. परंतु पावसाच्या थोड्यावेळाच्या हजेरीने या शेतजमिनीला पडलेल्या भेगाही जातात. परंतु आता पाऊस पडायला हवाय. कोकणातील शेतकरी संततधार पावसाच्या प्रतिक्षेत आहे. सध्या कोकणात पावसाच्या लपा-छपीचा खेळ सुरू आहे.

महाराष्ट्रात पूर्वी कोकण प्रांत भात पिकात अग्रेसर होता. शालेय पाठ्यपुस्तकात भुगोल शिकताना त्यामध्ये कोकणातील पिकांमध्ये भात अग्रस्थानी असल्याचे सांगितले जायचे.कोकणच्या जनतेच्या खाद्य पदार्थांमध्ये भात आणि मासे हे प्रमुख अन्न म्हटले जायचे. कोकणातील रायगड जिल्हा हा सर्वांधिक भात पिकवणारा जिल्हा म्हणून ओळखला जायचा. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात, नाचणी पिक घेतलं जात. गेल्याकाही वर्षांमध्ये शेतीच स्वरूप बदलले. कोकणातील अनेक कुटुंब नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने कोकण बाहेर नागपूर, नाशिक, पुणे, मुंबई या शहरीभागात वास्तव्याला गेले. कोकणात कायमस्वरूपी रहाणाऱ्यांची संख्या फारच कमी झाली. यामुळे सहाजिकच कोकणातील शेतीवर झाला. भातशेती करायची तर किमान कुटुंबांतील चार-सहा शेतात काम करणारी माणसं हवीत. शेतात राबणारे हातच कमी झाले. नोकरी-व्यवसायात तरूण शहरांमध्ये गेले आणि थर-थरत्या हातांची समाधानी मनाची वृद्ध माणसं गावात आहेत. परंतु त्यांची शेतात काम करण्याची क्रयशक्तीच उरलेली नाही. परिणामी कोकणातील भातशेतीचे क्षेत्र कमी झाले. अर्थात काहींनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत शेती करण्याचा प्रयत्न केला. परंतु पूर्वीप्रमाणे पारंपारिक पद्धतीची शेती तंत्र आता दुर्मिळ होत चालले आहे. जून महिन्याच्या ७ तारीखला मृगनक्षत्राच्या मुहूर्तावर पावसाचे आगमन होत असे. सुरूवातीच्या काही दिवसातच पाऊस असा काही बरसायचा की आता पाऊस थांबाव असं शेतकरी म्हणायचा कोकणातील नदी-नाले, ओहोळ दुथडी भरून वहात असत. मे महिन्याच्या रणरणत्या उन्हाळा संपून येणाऱ्या पहिल्या पावसाने कोकणातील वातावरण असं काही बदललेल असायचे. आंबा, काजू, रतांबा आदी फळ पिकांची जोडणी करणारा शेतकरी भात पेरणीसाठी सज्ज असायचा. पावसाचं आगमन कोकणातील शेतकऱ्याला खुणावयचा, भातशेती करणारा शेतकरी किमान वर्षभर कुटुंबाला भात पूरेल अशा पद्धतीने नियोजन करायचा. भात आणि मासे त्याच कालवण (आमटी) हे प्रमुख अन्न पदार्थ असल्याने भात भरपूर पिकल की कोकणातील घरा-घरात आनंदी वातावरण होते. पैशाची श्रीमंती फार नव्हती. कोकणातील शेतकऱ्याच्या गाठीला अधिकचा पैसा नव्हता. जेमतेम मुलांच शिक्षण दोन वेळच खाण-जेवण मिळतय याचा कोण आनंद कोकणातील शेतकऱ्याच्या मनात असायचा.
घरात वर्षभर खाऊनही भाताची कणगी, मुडी बांधलेली आहे. याचा केवढा मोठा आनंद कोकणातील शेतकऱ्यात होता. आता घरात कणगी भरलेलं भात आणि तसा शेतकरी शोधावा लागेल. भाताचा संचय करणारा शेतकरीही आता नाही. असलाच तर रायगड जिल्ह्यातील काही भागात मोठ्याप्रमाणात भातशेती करणारा मोठा शेतकरी असू शकतात. परंतु दक्षिण कोकणात मात्र आता भातशेतीचे क्षेत्र फारच कमी झाले आहे. परंतु कुटुंबातून निष्ठेने, आवड म्हणून आणि कुटुंबाची कोकणची परंपरा म्हणून शेती केली जाते. अशा कुटुंब संस्था आजही एकत्र कुटुंबांचे दर्शन घडवत शेतात राबताना आनंद घेताना दिसतात. परंतु ऋतुचक्रातील अनियमितता या शेतीच्या आड येऊ लागली आहे. यावर्षी जूनचा पहिला पंधरवडा देखिल सुकाच गेला. अखेरीस पाऊस पडला तर पेरणी करावयाची की नाही अशा द्विधा मन:स्थितीत असताना थोडाफार पाऊस पडला त्याचा आधार घेत कोकणातील शेतकऱ्यांनी पेरणी केली. परंतु मधले अनेक दिवस पाऊस गायब झाला. पाऊस नसल्याने भात पेरणी होऊन देखिल भात चांगल उगवेल याची खात्री उरली नाही यातच, एप्रिल-मे महिन्यात जसे रण-रणता उन्हाळा असतो त्यापेक्षाही अधिक तीव्र उन्हाळा कोकणात जाणवू लागला. शेतात पेरलेलं भात येईल की नाही याची शाश्वती नसताना मध्येच पावसाचा शिडकावा होऊ लागला. पावसाच्या या शिडकाव्याने कोकणातील शेतकरी काहीसा सुखावला, म्हणजे भाताची ‘जीव जगवणी’ झाली असं त्याला वाटू लागलं. आणि परत पाऊस गायब झाल्याने विहिरीच्या, नदीच्या पाण्याने शेती शिपून भात जिवंत ठेवण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला. पुन्हा एकदा पाऊस गायब झाला. आता कुठे गेले दोन दिवस पाऊस थोडावेळ हजेरी लावतोय अनेक भागांमध्ये कडक उन्हामुळे शेतामध्ये भेगा पडल्या आहेत. परंतु पावसाच्या थोड्यावेळाच्या हजेरीने या शेतजमिनीला पडलेल्या भेगाही जातात. परंतु आता पाऊस पडायला हवाय. कोकणातील शेतकरी संततधार पावसाच्या प्रतिक्षेत आहे. सध्या कोकणात पावसाच्या लपा-छपीचा खेळ सुरू आहे. पाऊस केव्हा आणि कितीही दिवस गायब होतो. पावसाची हंगामात पूर्वी कधीतरी ‘उन्ह आणि पाऊस कोल्याचा लगीन’ हे गंमतीच वाक्य उच्चारण्याची हिम्मतही कोकणातील शेतकऱ्यांमध्ये उरलेली नाही. वारंवार गायब होणारा पाऊस बरसावा याच प्रतिक्षेत कोकणातील शेतकरी आहे.