जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू
निलेश जाधव / देवरूख
संगमेश्वर तालुक्यातील कुंडी येथील युवकाने देवरूखमध्ये विषप्राशन केल्याची धक्कादायक घटना आज बुधवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सोहम राजाराम पवार असे या विषप्राशन केलेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्यावर सध्या रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत देवरूख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, सोहम याची प्रेयसी गेली चार-पाच दिवस त्याच्याशी बोलत नव्हती. याच रागातून त्याने देवरूख येथे विष प्राशन केले. अस्वस्थ वाटू लागल्याने लागलीच त्याला देवरूख ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. याठिकाणी प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला अधिक उपचारासाठी रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रूग्णालयात हलवण्यात आले. याठिकाणी त्याच्यावर सध्या उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, युवकाने प्रेयसी बोलत नसल्याच्या रागातून अशाप्रकारे टोकाचे पाऊल उचलून विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने सुज्ञ नागरिकांमधून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. या घटनेचा तपास देवरूख पोलीस करीत आहेत.










