मुंबई: सायबर सुरक्षा आणि वीज ग्राहकांच्या माहितीच्या गोपनीयतेसाठी महावितरणने एक महत्त्वाचा बदल केला आहे. आता लघुदाब वर्गवारीतील वीज ग्राहकांना त्यांच्या वीज बिलाची पीडीएफ प्रत अधिकृत संकेतस्थळावरून डाऊनलोड करण्यासाठी नोंदणीकृत प्रवेश (लॉगिन) करणे अनिवार्य करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या सायबर सुरक्षेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार हा बदल करण्यात आला आहे.
महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावरील ‘वीजदेयक अवलोकन/भरणा’ (View/Pay Bill) या पेजवर घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक आणि इतर लघुदाब ग्राहकांसाठी वीज बिल डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध आहे. यापूर्वी केवळ १२ अंकी ग्राहक क्रमांक टाकून बिल डाऊनलोड करता येत होते, मात्र आता यासाठी लॉगिन करणे आवश्यक आहे.
वीज बिल भरण्यासाठी लॉगिनची गरज नाही:
या नव्या नियमामुळे वीज बिल ऑनलाइन भरण्यासाठी लॉगिनची आवश्यकता नाही. वीज बिल भरण्याचा पर्याय लॉगिनशिवायही खुला ठेवण्यात आला आहे. परंतु, पीडीएफ वीज बिल डाऊनलोड करण्यासाठी मात्र लॉगिन करणे अनिवार्य आहे.
नोंदणी प्रक्रिया:
ज्या ग्राहकांनी अद्याप लॉगिनसाठी नोंदणी केलेली नाही, त्यांनी ‘वीजदेयक अवलोकन/भरणा’ पेजवर ग्राहक क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी (असल्यास) भरून नोंदणी करणे आवश्यक आहे. यानंतर त्यांना एक लॉगिन आयडी आणि पासवर्ड तयार करावा लागेल.
लॉगिनचे फायदे:
एकदा लॉगिन केल्यानंतर ग्राहकांना अनेक ऑनलाइन सेवांचा लाभ घेता येतो. यामध्ये एकापेक्षा जास्त वीज जोडण्यांची माहिती पाहणे, १२ अंकी ग्राहक क्रमांक लक्षात न ठेवता सेवा वापरणे, वीज बिलावरील नाव किंवा वीज भार बदलणे, तक्रार करणे किंवा तक्रारीची सद्यस्थिती तपासणे, वीज बिलांचा भरणा करणे आणि पत्ता बदलणे यांसारख्या सेवांचा समावेश आहे.











