सीआरझेडप्रकरणी आमदार निलेश राणे यांचे मोलाचे सहकार्य; गाबीत फिशरमन फेडरेशनकडून आभार!

आमदार निलेश राणे यांनी स्वखर्चाने अतिरिक्त वकील उपलब्ध करून दिला

हरित लवादाच्या आदेशामुळे मच्छिमारांना दिलासा : विष्णू मोंडकर

पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांच्या सकारात्मक भूमिकेबाबत गाबीत फिशरमन फेडरेशनकडून आभार

मालवण | प्रतिनिधी : राष्ट्रीय हरित लवादाने सीआरझेडप्रकरणी दिलेला आदेश किनारपट्टीवरील नागरिक, मच्छिमारांची राहती घरे आणि पारंपरिक व्यवसायांना दिलासा देणारा आहे. पालकमंत्री नितेश राणे व आमदार निलेश राणे यांनी घेतलेली सकारात्मक भूमिका आणि प्रशासकीय स्तरावर केलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा महत्त्वपूर्ण ठरला आहे. स्थानिकांची बाजू लवादासमोर भक्कमपणे मांडण्यासाठी आमदार निलेश राणे यांनी स्वखर्चाने अतिरिक्त वकील उपलब्ध करून दिला होता. याबाबत गाबीत फिशरमन फेडरेशनचे अध्यक्ष विष्णू मोंडकर यांनी आभार व्यक्त केले.

हरित लवादाने कोणतेही बांधकाम पाडण्याचे थेट अंतिम निर्देश दिलेले नसून, कायदेशीर प्रक्रियेनुसार निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सहा महिन्यांची मुदत दिली आहे. गावठाण व कोळीवाड्यांचे सीमांकन करून स्थानिकांचे निवारा आणि उपजीविकेचे हक्क सुरक्षित करण्यासाठी फेडरेशन ही प्रयत्नशील आहे. पालकमंत्री नितेश राणे व आमदार निलेश राणे यांच्या सहकार्याने हा विषय कायदेशीर आणि प्रशासकीय स्तरावर सकारात्मकरीत्या मार्गी लागेल, असा विश्वास विष्णु मोंडकर यांनी व्यक्त केला आहे. किनारपट्टीवरील नागरिक, पर्यटन व्यावसायिक आणि मच्छिमार बांधव संघटितपणे एकत्र असल्याचा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे.