भात पिकावर निळे भुंगेरे किडीचा प्रादुर्भाव !       

वेळीच उपाय योजना करण्याचे कृषी विभागाचे आवाहन 

मसुरे | झुंजार पेडणेकर : सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात पिकावर निळे भुंगेरे (Blue Beetle) या किडीचा प्रादुर्भाव काही प्रमाणात दिसून येत आहे. ही कीड पिकांचे मोठे नुकसान करत असल्याने शेतकऱ्यांनी वेळीच उपाययोजना करन्याचे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी उमाकांत पाटील यांनी केले आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी जनजागृती मोहीम हाती घेतली असून, किडीची ओळख, प्रादुर्भावाची कारणे, लक्षणे आणि नियंत्रणाचे उपाय याबाबत सविस्तर माहिती दिली जात आहे.

भुंगेरे गर्द निळ्या रंगाचे असून अळी भुरकट पांढऱ्या रंगाची असते. या किडीच्या अळी अवस्था आणि प्रौढावस्था या दोन्ही हानिकारक आहेत. ही कीड पानाचा हिरवा भाग खरवडून खाते. परिणामी पानांवर पांढरे पट्टे दिसून येतात. या किडीचा प्रादुर्भाव पाणथळ जमीन आणि नत्र खताच्या अवाजवी वापराने होऊ शकतो.

ही कीड भात पिकानंतर बांधावरील गवतावर आणि कापणी नंतरच्या भाताच्या फुटव्यांवर उपजीविका करते आणि पुढील हंगामात भात पिकास उपद्रव देते. भात लावणीनंतर बांध स्वच्छ ठेवावेत.

 

प्रादुर्भावाची कारणे

उन पाऊस, पावसाची उघडीप व वातावरणातील जास्त आर्द्रता या किडीच्या वाढीसाठी अनुकूल ठरते. भात पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत, म्हणजेच लावणीनंतर ही कीड मोठ्या प्रमाणात आढळते. मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यास पिकाची वाढ खुंटते आणि उत्पादनात घट होते.

कृषी विभागाने या किडीच्या नियंत्रणासाठी उपाययोजना सुचविल्या

आहेत.

जमिनीत पाणी जास्तकाळ न साठता निचरा होईल याची काळजी घ्यावी.भात खाचराच्या आजुबाजूस असलेल्या निळ्या भुंगेऱ्याच्या इतर खाद्य वनस्पती उदा. कसई, धुर, चिमण चारा, रानटी नाचणी इत्यादींचा समुळ नायनाट करावा. जेणेकरून या किडीच्या प्रौढ भुंग्यांना खाद्य उपलब्ध न झाल्यामुळे त्यांचा पुढील प्रादुर्भाव रोखता येतो.

किडीच्या नियंत्रणासाठी व्किनॉलफॉस २५% प्रवाही २० मि. ली. किं ४०% प्रवाही १२.५ मि.ली. किंवा लॅमडा सायहेलोथ्रिन ५% प्रवाही ६.२ १० लि. पाणी या प्रमाणातकीटकनाशकाचा वापर करावा.

अधिक माहितीसाठी जवळच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी यांनी केले आहे.