बांबू लागवडीमुळे कोकणातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या संपन्न होणार – डॉ. रवींद्र प्रभुदेसाई

राजापूर | प्रतिनिधी – “ऊस शेतीने जसा पश्चिम महाराष्ट्राचा आर्थिक विकास साधला, त्याच धर्तीवर कोकणातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर बांबू लागवड केल्यास चांगले उत्पन्न मिळेल. केंद्र सरकार यासाठी भरघोस अनुदान देत आहे. बांबू लागवडीमुळे कोकणातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या संपन्न होणार असून संपूर्ण कोकणाचे अर्थकारणच बदलून जाईल,” असा ठाम विश्वास पितांबरीकार आणि सुगंधी व समृद्ध कोकण विकास मंचाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांनी व्यक्त केला.

ते पितांबरी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी महादव पुजारी, तळवडेच्या सरपंच सौ. गायत्री साळवी उपस्थित होत्या.

डॉ. प्रभुदेसाई यांनी सांगितले की, शासनमान्य माळी प्रशिक्षणांतर्गत बागकाम तंत्रज्ञान प्रमाणपत्र अभ्यासक्रम १३ ऑगस्टपासून तळवडे येथे सुरू होत आहे. बागायती, हिरवळ आणि पर्यावरणीय व्यवस्थापनावरील तांत्रिक ज्ञान, कौशल्य व प्रशिक्षण देणे हा या केंद्राचा उद्देश आहे. प्रथमच खाजगी आस्थापनाला प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची परवानगी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने दिली आहे.

या प्रशिक्षणातून स्थानिक शेतकरी व विद्यार्थ्यांना नवीन संधी व रोजगार उपलब्ध होणार असून प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्यांना पितांबरीमध्ये नोकरीची संधी मिळेल. प्रशिक्षणासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. मुंबईसारख्या महानगरांत प्रशिक्षित माळींसाठी मोठी मागणी असून त्यांना २५ ते ३० हजार रुपयांची नोकरी सहज मिळू शकते, असे त्यांनी सांगितले.

डॉ. प्रभुदेसाई पुढे म्हणाले की, “झाडे लावा व वाढवा” हा केवळ नारा नसून लावलेली झाडे शंभर टक्के जगली पाहिजेत. यासाठी वड, पिंपळ, औदुंबर आदींची पाच हजार झाडे तळवडे–ताम्हाणे रस्त्यालगत लावण्यात आली आहेत.

कोकणात माकडांचा वाढता उपद्रव लक्षात घेऊन पितांबरीने संशोधनातून ‘अनिल रिपेलंट’ हे औषध विकसित केले आहे. शेतीभोवती याचा वापर केल्यास माकडांचा वावर पूर्णपणे थांबतो व पिकांचे नुकसान होत नाही, असा दावा त्यांनी केला. या संशोधनामुळे शेतकरी समाधानी असल्याचेही ते म्हणाले.