विसापूर ग्रामस्थांनी स्वखर्चाने केला रस्ता

विसापूर गणपती मंदिर ते पहिली वाडी पर्यंत कच्चा रस्ता

गुहागर | प्रतिनिधी : तालुक्यातील विसापूर गावातील गणपती मंदिर ते पहिली वाडी पर्यंतचा कच्च्या रस्ता ग्रामस्थांनी तयार केला. त्यासाठी ग्रामविकास मंडळ स्थानिक व मुंबई विभाग यांनी प्रयत्न केले.

विसापूर ग्रामस्थांनी मुख्य रस्ता ते पहिली वाडी या वाडीरस्त्याची मागणी केली होती. पण गणपती मंदिरानजिक नाल्यावर पुल बांधणे आवश्यक होते. रस्ता आणि पूल दोन्हीला निधी मिळण्यासाठी तांत्रिक अडचणी होत्या. त्यामुळे ग्रामस्थांनी शासनाकडे केवळ पुलाची मागणी केली. आमदार भास्कर जाधव यांनी या पुलासाठी 10 लाखाचा निधी दिला. त्यातून नाल्यावर छोटा पुल बांधण्यात आला. त्यानंतर ग्रामस्थांनी श्रमदानातून मुख्य रस्ता ते गणपती मंदिर असा रस्ता तयार केला.
यावेळी उर्वरीत गणपती मंदिर ते पहिली वाडी पर्यंत कच्च्या रस्ता करण्याचे ग्रामस्थ मंडळाने ठरवले. त्यासाठी मुंबई मंडळी आणि स्थानिक मंडळींच्या बैठका झाल्या. संबंधित जमीन मालकांना कल्पना देवून त्यांचे मत जाणून घेण्यात आले. त्यासाठी मुंबईतील पदाधिकारी देखील विसापूरला येऊन गेले. सर्वांची संमती मिळाल्यानंतर श्रमदानाची तारीख निश्चित करण्यात आली. स्थानिक मंडळींनी श्रमदानासाठी आवश्यक साहित्य आणि चहा, नाश्ता याची व्यवस्था केली. सर्वांच्या सहकार्य आणि सहभागातून हा रस्ता तयार झाला.
यासाठी उत्तम देर्देकर, श्रीकांत किर्वे, अनंत तेरेकर, मंगेश कदम, अनिल किर्वे, निलेश किर्वे, वैभव किर्वे, संतोष किर्वे, दर्शन मेढेकर, पडवळ साहेब, अमोल मेढेकर व मुंबई कार्यकर्ते दर्शन मेढेकर, दत्ताराम नवरत, मनोहर गावणंग, शशिकांत पडवळ, यांनी सहकार्य केले. विसापूर ग्रामस्थांनी सरकारची मदत न घेता आपल्या विकासासाठी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. विशेष म्हणजे आता गणपती मंदिर ते तळवली आग्रेवाडी पर्यंत रस्त्या करण्याचे प्रयत्न ग्रामस्थांनी सुरू केले आहेत.