बांदा शहरात गुरुवारी भव्य तिरंगा यात्रेचे नियोजन

 

बांदा : प्रतिनिधी

७८ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवार १४ रोजी बांदा येथे सर्व भारतीय नागरिकांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा यात्रा आयोजित करण्यात आली आहे. या तिरंगा यात्रेस छत्रपती शिवाजी महाराज पुतळा गडगेवाडी येथून दुपारी ३ वाजता सुरुवात होईल, अशी माहिती भाजपचे बांदा मंडल अध्यक्ष स्वागत नाटेकर यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

 

ही यात्रा श्रीराम चौक बांदा, हॉस्पिटल कट्टा, गांधीचौक, तेली तिठा मोर्येवाडा मार्गे श्री देव बांदेश्वर मंदिर पर्यंत आयोजित करण्यात आली आहे. श्रीदेव बांदेश्वर मंदीरात या यात्रेचा समारोप केला जाईल. या यात्रेस जास्तीत जास्त नागरिकांनी, शाळा, कॉलेज मधील विद्यार्थी यांनी सहभागी व्हावे असे आवाहन स्वागत नाटेकर यांनी केले.

 

तत्पूर्वी सकाळी १०.३० वाजता डेगवे येथील हुतात्मा देऊ नाईक यांच्या स्मारकाची स्वच्छता करून आदराजंली वाहण्यात येईल. पत्रकार परिषदेत भारतीय जनता पक्षाचे मंडल सरचिटणीस मधुकर देसाई, भारतीय जनता पक्षाचे बांदा शहर अध्यक्ष बाबा काणेकर, बांदा मंडल कार्यकारणी सदस्य संदीप बांदेकर, राकेश केसरकर आदी उपस्थित होते.