‘हर घर तिरंगा’ अंतर्गत बँक ऑफ इंडिया जिल्हा अग्रणी बँकेतर्फे बाईक रॅली

रत्नागिरी, दि. १२  – ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत अग्रणी जिल्हा व्यवस्थापक कार्यालय व नगर राजभाषा कार्यान्वयन समिती (नराकास) यांच्या संयुक्त विद्यमाने आज बँकर्स बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. ही रॅली बँक ऑफ इंडिया विभागीय कार्यालय, शिवाजीनगर ते जयस्तंभ आणि परत जयस्तंभ ते बँक ऑफ इंडिया विभागीय कार्यालय, शिवाजीनगरपर्यंत काढण्यात आली.

रॅलीचा शुभारंभ विभागीय व्यवस्थापक, बँक ऑफ इंडिया तसेच अध्यक्ष (नराकास) रविंद्र देवरे यांच्या हस्ते झाला. या रॅलीत उपविभागीय व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया अंजनी कुमार सिंग आझाद, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक दर्शन कानसे, नराकास सदस्य सचिव रमेश गायकवाड, झोनल सेक्रेटरी बँक ऑफ इंडिया ऑफिसर असोसिएशन किरण खोपडे, ललित प्रकाश दीपस्तंभ कार्यालय, भारतीय तटरक्षक वायू स्थानकाचे २४ जवान तसेच इतर नराकास सदस्य कार्यालये आणि शहरातील सर्व बँकांचे अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले होते.

मोठ्या संख्येने उपस्थित राहून सर्वांनी रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शेवटी बँक ऑफ इंडिया विभागीय कार्यालय, रत्नागिरी येथे श्री. कानसे आणि श्री. गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले व बाईक रॅलीची सांगता झाली.