बांद्यातून सकाळी कदंबा बसफेरी सुरू करा

भाजपा महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर यांची गोवा मुख्यमंत्र्यांकडे मागणी

बांदा l प्रतिनिधी : बांदा परिसरातून गोवा राज्यात जाणाऱ्या विद्यार्थी, नोकरदार, रुग्ण यांची गैरसोय होत असल्यामुळे बांदा शहरातून सकाळी ६.३० वाजता कदंब बस सेवा सुरू करण्याची मागणी भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर यांनी गोवा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे केली आहे. तसे निवेदनही त्यांनी सादर केले. याबाबतची कार्यवाही तातडीने करण्याची ग्वाही डॉ. प्रमोद सावंत यांनी शिष्टमंडळाला दिली.

 

बांदा शहर गोवा राज्याच्या सीमेवर असल्यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षण, नोकरी, वैद्यकीय तसेच इतर कामांसाठी गोव्यात ये-जा करतात.

सध्या सकाळी ७ वाजेपर्यंत गोव्याला जाण्यासाठी बांदेश्वर मंदिर येथून बस उपलब्ध नाही. त्यामुळे गोव्यामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळेत पोहोचणे अवघड होते. पत्रादेवी मार्गे मडगाव बस मुंबई – गोवा महामार्गावरून जाते. सदर बस शहरातून बांदेश्वर मंदिर कडून नेल्यास स्थानिकांना त्याचा फायदा होईल. सदर बस बांदेश्वर मंदिर मार्गे सोडावी किंवा नवीन बस फेरी सुरू करावी. तसेच रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या कदंब बस सेवेचा मडगाव ते बांदा असा विस्तार करण्याचीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

 

डॉ. प्रमोद सावंत यांनी सदर कदंबा बस सेवा तातडीने सुरू करण्याची कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिले. यावेळी पेडणे आमदार प्रवीण आर्लेकर, माजी सभापती शितल राऊळ, ग्रा. पं. सदस्य रत्नाकर आगलावे, शहराध्यक्ष बाबा काणेकर, हुसेन मकानदार, निलेश कदम, गुरु कल्याणकर, रमेश सावळ, नंदू महाजन, सुनील राऊळ, राजेश विर्नोडकर, संतोष सावंत, यतीन धामापूरकर आदीसह भाजप पदाधिकारी उपस्थित होते.