शीळ गोठणे दोनिवडे चिखलगाव रस्त्याची खड्यामुंळे दुरवस्था,अपघात होण्याचा धोका

खड्डे न भरल्यास आंदोलनाचा ईशारा
राजापूर (वार्ताहर): अतिवृष्टीमुळे शीळ गोठणे दोनिवडे चिखलगाव रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. या खड्यातून रिक्षा चालविताना तारेवरची कसरत करावी लागत असून त्यातून अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे तातडीने या मार्गावरील खड्डे बुजवून रस्ता वाहतुकीस सुरळीत करण्याची मागणी रिक्षा व्यवसायिकांसह ग्रामस्थांतून करण्यात आली आहे. तसे निवेदन शुक्रवारी उपअभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग राजापूर यांना देण्यात आले.
शहरानजीकच्या शीळ, गोठणे-दोनिवडे, चिखलगाव, आंगले, फुपेरे आदी गावातील ग्रामस्थांना विविध कामानिमित्ताने राजापूर शहरामध्ये नियमित ये-जा करावी लागते. त्यासाठी शिळ-गोठणेदोनिवडे-चिखलगाव या रस्त्याचा प्रामुख्याने उपयोग केला जातो. त्याचवेळी, पाचल येथून सौंदळमार्गे राजापूरात येण्यासाठी आणि राजापूरतून शीळमार्गे पाचल येथे जाण्यासाठी हा शॉर्टकट मार्ग असल्याने आठवडा बाजारामध्ये येणारे व्यापारी आणि अन्य वाहन चालक या रस्त्याला प्रवासासाठी प्राधान्य देतात. त्यातून, या रस्त्यावर वाहनांची नेहमीच वर्दळ असते. मात्र, सद्यस्थितीत या रस्त्याची पार दुरावस्था झालेली आहे.
 रस्त्यामध्ये ठिकठिकाणी मोठ्याप्रमाणात पडलेल्या खड्ड्यामुळे रस्त्याने वाहने चालविणे आणि प्रवास करणे जिकरीचे झाले आहे. या रस्त्यावरील खड्डे जांभ्या दगडाने भरण्याचा आपल्या विभागाकडून केला जात असलेला प्रयत्नही कामाच्या सुमार दर्जामुळे केविलवाणा ठरत आहे. एवढेच नव्हे तर, रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडीही यावर्षी तोडण्याची तसदी आपल्या विभागाने यावर्षी घेतलेली नाही. रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेमुळे वाहने चालविणे मुश्किल झालेच आहे. सोबत, खड्ड्यांमुळे प्रवाशांना मणक्यांच्या आजारासारख्या गंभीर समस्येला भविष्यामध्ये सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर, दुसऱ्या बाजूला वाहनांचीही मोठ्याप्रमाणात झीज होत आहे. त्यातून आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे.
रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेची दखल घेवून तात्काळ योग्य त्या उपाययोजना व्हाव्यात अन्यथा, त्याविरोधात आक्रमकपणे आंदोलन छेडले जाईल. त्याला सर्वस्वी आपला विभाग जबाबदार राहील याची कृपया नोंद घेवून रस्त्याच्या दुरूस्तीबाबत योग्य त्या उपाययोजना व्हाव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी रिक्षा संघटनेचे समीर जैतापकर, योगेश बाईत, सिताराम भोवड, प्रकाश बाईत, श्री. सुर्वे, श्री. सर्जीत बलबले, शिळचे माजी सरपंच नामदेव नामदेव नागरेकर, राजेंद्र बाईत, संतोष मोंडे आदी उपस्थित होते.