‘सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान’च्या वतीने कृतज्ञता सोहळा संपन्न

स्वातंत्र्यदिनानिमित्त नगरपरिषद व उपजिल्हा रुग्णालयातील सफाई कामगारांचा सन्मान 

सावंतवाडी । प्रतिनिधी : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ‘सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान’ने नगरपरिषद आणि उपजिल्हा रुग्णालयातील सुमारे १०० कंत्राटी सफाई कामगारांचा सन्मान करून त्यांना शिधावाटप केले. संस्थेचे सल्लागार शैलेश पै यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम दरवर्षी १५ ऑगस्टला आयोजित केला जाईल, असे जाहीर करण्यात आले. सफाई कामगार हेच शहराचे खरे हिरो असून, ते आपले आरोग्य धोक्यात घालून शहर स्वच्छ ठेवतात, असे गौरवौद्गार शैलेश पै यांनी काढले.

या सोहळ्यात अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये गेल्या ४० वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले बाबल अल्मेडा, १०८ रुग्णवाहिकेवरील २४ तास सेवा देणारे डॉ. दानवे, धैर्यशील शिर्के, रामचंद्र निकम, बुधाजी जाधव, सिटीस्कॅन मॅनेजमेंटचे प्रथमेश परब आणि दिव्यांग प्रशिक्षण केंद्र चालवणारे रूपाली पाटील व विनोद धुरी यांचा समावेश होता. तसेच, नाट्य आणि सिनेमा क्षेत्रातील अभिनेत्री कल्पना बांदेकर, ज्येष्ठ नागरिक अरुण मेस्त्री, आणि भारत भूषण पुरस्कार प्राप्त लक्ष्मण कदम यांचाही सन्मान करण्यात आला.

संस्थेच्या सेवाकार्यासाठी मदत करणारे दानशूर व्यक्ती रामकृष्ण कोंडीयाल, चेतन गुप्ता आणि सुराणा इंटरप्रायजेस यांचेही आभार मानून त्यांना सन्मानित करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष सतीश बागवे यांनी संकटग्रस्त आणि गरजूंना मदत करण्यासाठी संस्था नेहमीच कटिबद्ध राहील, अशी ग्वाही दिली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या सर्व कार्यकर्त्यांनी मोलाची कामगिरी बजावली.