खेड – दहीकाला उत्सवाच्या निमित्ताने खेडमध्ये आयोजित कार्यक्रमात गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी उपस्थित जनतेला संबोधित करताना खेडच्या विकासाचा दृढनिश्चय व्यक्त केला. “खेडचा आवाज कलानगरपर्यंत पोहचला पाहिजे,” असे विधान करताना त्यांनी खेडवासियांचे आभार मानले.
कदम म्हणाले की, “गेल्या वर्षी याच व्यासपीठावरून मी विश्वास व्यक्त केला होता की विकासाचे थर रचून 2024 च्या विधानसभेची हंडी आपणच फोडणार. आणि तो विश्वास आपण सर्वांनी व जनतेने खरा करून दाखवला. यासाठी मी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो. रामदास भाईंनी खेड तालुक्याचा विकास घडवून आणला. त्यांच्या पायाभूत विकासाच्या कार्याला जोड म्हणून आज मी खेड मतदारसंघात विकासाची गंगा आणण्याचा प्रयत्न करीत आहे. खेड तालुक्याचे नाव रामदास भाईंनी महाराष्ट्रात उज्वल केले. त्या खेडच्या विकासासाठी अजून निधी आणणे, विकास अधिक पुढे नेणे हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. या प्रवासात आपण दिलेला आशीर्वाद माझ्यासाठी अमूल्य आहे.”
खेड तालुक्याला पुन्हा एकदा राज्यमंत्री पद लाभले असून हा केवळ योगेश कदम यांचा सन्मान नसून खेड तालुक्यातील प्रत्येक नागरिकाचा बहुमान असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “या राज्यमंत्री पदाच्या माध्यमातून खेड तालुक्याचा सर्वांगीण विकास घडवण्यासाठी मी सतत प्रयत्नशील राहीन,” असा विश्वास कदम यांनी जनतेला दिला.
शिवसेनेच्या वतीने हा हिंदू सण मोठ्या उत्साहात साजरा होत असल्याबद्दल पथाधिकाऱ्यांचे अभिनंदन करताना कदम म्हणाले की, “आपले महायुती सरकार हे हिंदुत्ववादी सरकार असून, ते यशस्वी वाटचाल करत पुढे जाईल. या प्रवासासाठी आपले आशीर्वाद कायम आमच्यावर राहू द्यात, अशी माझी नम्र विनंती आहे.”
शेवटी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सर्वांना दहीकाला उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.












