BREAKING NEWS: आंबा घाटात पुन्हा दरड कोसळली; वाहतूक ठप्प

रत्नागिरी: आंबा घाटात सोमवारी पुन्हा एकदा दरड कोसळल्याने मिऱ्या नागपूर महामार्गावरील वाहतूक थांबली आहे. सोमवारी सकाळी या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असताना ही घटना घडली असून, घाटातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी ठेकेदार कंपनी रवी इन्फ्राकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. काही वेळातच वाहतूक पूर्ववत होईल, अशी माहिती देण्यात आली आहे.
मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे आंबा घाटात दरडी कोसळण्याचे प्रकार वाढले आहेत. यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या जेसीबी आणि इतर यंत्रसामग्रीच्या मदतीने दरड बाजूला करण्याचे काम वेगाने सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यावर वाहतूक सुरु करण्यात येईल.
दरम्यान, प्रवाशांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा किंवा वाहतूक पूर्ववत होण्याची वाट पाहावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.