खेड (राकेश कोळी) : गेल्या सहा दिवसांपासून खेड तालुक्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून यामुळे नद्या–नाले तुडुंब भरून वाहत आहेत. सलग चौथ्या दिवशी जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडली असून खेड शहर आणि खाडीपट्टा विभाग यांचा संपर्क तुटला आहे. नारंगी नदीलाही पूर आल्याने भात शेती पाण्याखाली गेली आहे. व्यापारी वर्ग हवालदिल झाला असून खेड आगारातील एसटीच्या तब्बल १५८ फेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहेत.
दरम्यान, पिंपळवाडी, शिरवली, नातुवाडी व शेलारवाडी या प्रकल्पांतून विसर्ग सुरू आहे. पिंपळवाडी प्रकल्पाची पातळी १२६.६४ मीटरवर पोहोचली असून ६७.३७ टक्के साठा झाला आहे. यामधून १३१.५० घनमीटर प्रति सेकंद एवढा सांडवा विसर्ग सुरू असून १.६८ घनमीटर प्रति सेकंद विमोचक विसर्ग करण्यात येत आहे. शिरवली लघु प्रकल्पातून १४ घनमीटर प्रति सेकंद पाणी सोडले जात आहे, तर नातुवाडी प्रकल्पातून ३२.७२३ घनमीटर प्रति सेकंद विसर्ग सुरू आहे. शेलारवाडी योजनेतून सांडवा विसर्ग शून्य असला तरी ५.०४३ घनमीटर प्रति सेकंद विमोचक विसर्ग होत आहे.
तालुक्यात गेल्या २४ तासांत १७० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. शनिवारी १०९.५७, रविवारी १७८.७१, सोमवारी १७० तर मंगळवारी १७२.१४ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, सलग चार दिवस शतकावर पावसाची नोंद झाली आहे. जूनपासून आतापर्यंत तालुक्यात एकूण ३२४०.१४ मि.मी. पाऊस झाला आहे. महसुली विभागात खेड १५५, भरणे १६५, शीर्षी १७५, आंबवली १८६, लवेल २२६, कुलवंडी १५८ व धामनंद येथे १४० मि.मी. पावसाची नोंद झाली असून एका दिवसात १२०५ मि.मी. पाऊस झाल्याची आकडेवारी समोर आली आहे.
सतत कोसळणाऱ्या पावसामुळे जगबुडी नदीची पातळी सकाळी ११:३० वाजता ७.४० मीटर होती, मात्र नंतर थोडा पाऊस कमी झाल्याने ती ७.२० मीटरवर आली होती. सुर्वे इंजिनिअरिंगजवळील रस्त्यावर पाणी साचल्याने खेड–दापोली–मंडणगड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. प्रशासनाने तातडीने छोटी वाहने कुंभारवाडा मार्गे वळवून वाहतूक सुरळीत केली. गेल्या चार दिवसांच्या सततच्या पावसामुळे खेड बाजारपेठेतील व्यापारी गणेशोत्सवाच्या तयारीसाठी चिंताग्रस्त झाले आहेत. मे महिन्यात झालेल्या पावसाने आधीच नुकसान झाले असताना आता गणपती उत्सवातही व्यापारी वर्गाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. या पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बघाटे हे खेड व चिपळूण दौऱ्यावर रवाना झाले असून, जिल्हा पोलीस दल मागील तीन दिवसांपासून पुरस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.











