- आकर्षक बक्षिसांसह सहभागाची सुवर्णसंधी
चिपळूण (प्रतिनिधी) : शहर शिवसेना आयोजित घरगुती गणेश सजावट स्पर्धा यावर्षी उत्साहात पार पडणार असून याबाबतची माहिती शहरप्रमुख उमेश सकपाळ यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
सकपाळ म्हणाले की, “गणेशोत्सव हा आपल्या संस्कृतीचा आणि परंपरेचा अविभाज्य भाग आहे. घरगुती गणेशोत्सवातूनच भाविकांना श्रद्धा, संस्कार आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव होते. त्यामुळे शहर मर्यादित घरगुती गणेश सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.” स्पर्धेतून निवड झालेल्या प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना आकर्षक गणेश मूर्ती, रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. त्याचबरोबर तीन उत्तेजनार्थ पारितोषिकेही देण्यात येणार आहेत. तसेच प्रत्येक स्पर्धक कुटुंबाला सहभागाचे प्रमाणपत्र देऊन प्रोत्साहन दिले जाईल. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी आपले नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, सजावटीचा फोटो व एडिट न केलेला जास्तीत जास्त ६० सेकंदांचा व्हिडिओ शहर शिवसेना पुरविलेल्या ९०२२४५६६६७ या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवणे आवश्यक आहे. स्पर्धकांनी आपली नोंदणी संदेश व व्हिडिओ रविवार, दि. ३१ ऑगस्टपर्यंत पाठवावेत, असे आवाहन शहरप्रमुख उमेश सकपाळ यांनी केले. या स्पर्धेमुळे शहरातील गणेशभक्तांमध्ये सजावटीतील कलात्मकता व सामाजिक संदेश यांचा संगम पहायला मिळणार असून गणेशोत्सव अधिकच उत्साही होणार आहे












