“सिंधुदुर्ग जिल्ह्याला नाविन्यपूर्ण उंचीवर नेणार – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे”

नागरिकांपर्यंत पोहोचणार, योजनांमध्ये जिल्ह्याला आघाडीवर ठेवणार! 

पालकमंत्री नितेश राणे यांच्या एआय उपक्रमाला गती देणार. 

सिंधुनगरी l बाळ खडपकर :आपण महसूल प्रशासन व जिल्हा परिषद प्रशासनात यापूर्वी काम केले आहे. प्रत्येक जिल्ह्याचे प्रश्न वेगवेगळे आहेत. सांगली सह पूर्वीचे जिल्हे व तेथील कामाचा अनुभव असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात नाविन्यपूर्ण काम करू. या जिल्ह्याचे प्रश्न समजून घेण्यासाठी नागरिकांची संवाद व संपर्क तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री व लोकप्रतिनिधी यांच्याशी चांगला समन्वय ठेवला जाईल अशी माहिती सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे यांनी पहिल्या पत्रकार परिषदेत दिली.

सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर प्रथमच आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे व जिल्हा माहिती अधिकारी मुकुंदा चिलवंत उपस्थित होते.

यशदा कडून आयोजित प्रशिक्षणा दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्याला यापूर्वी भेट देता आली होती. त्यामुळे थोडीफार ओळख या जिल्ह्याची होती. सांगली जिल्ह्यात मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर काम करताना त्या यंत्रणेच्या कामकाजाचा अनुभव आहेच तत्पूर्वी धुळे येथे उपविभागीय अधिकारी म्हणून दोन वर्षे कामाचा महसूल प्रशासनातील अनुभव आहे. प्रत्येक जिल्ह्यांचे प्रश्न वेग वेगळे आहेत ते प्रथम समजून घेतले जातील. त्यासाठी नागरिकांशी संपर्क राहणार आहे. लोकप्रतिनिधी पत्रकार व माध्यमांचे प्रतिनिधी यांच्याशीही संपर्क व समन्वय राहणार असल्याचे जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे यांनी सांगितले.

सांगली जिल्ह्यात असताना तो जिल्हा राज्यात अव्वल रहावा म्हणून त्या ठिकाणी नाविन्यपूर्ण काम करण्याचा आपण प्रयत्न केला. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातही आपण करू व हा जिल्हा अव्वल ठेवण्याचा प्रयत्न करू.

सिंधुदुर्ग चे पालकमंत्री नितेश राणे यांनी ए आय चा प्रशासनातील कामकाजामध्ये सुरू केलेला वापर आणखी गतिमान करण्यासाठी आपण प्रयत्न करू. आज आणि उद्या मंत्री महोदयांचा जिल्हा दौरा असून त्यांची भेट घेऊन चर्चा करू व जिल्ह्यातील अनेक प्रश्नांबाबत सोडविण्याच्या दृष्टीने प्रशासन प्रमुख म्हणून प्रयत्न करू असेही जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी सांगितले.

जिल्ह्याला आघाडीवर नेण्यासाठी सर्वसमावेशक काम

 

“लोकांपर्यंत पोहोचणार, योजनांमध्ये जिल्ह्याला आघाडीवर ठेवणार आणि सर्वांना सोबत घेऊन काम करणार,” असा ठाम निर्धार जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी व्यक्त केला. त्या पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होत्या.

 

प्रशासकीय कारकिर्दीत आतापर्यंत सर्वत्र सुवर्ण मध्य साधता आला असल्याचे त्या म्हणाल्या. जिल्ह्याची माहिती प्रत्यक्ष अनुभवातून मिळाल्याने नियोजनबद्ध काम करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शासनाने दिलेले पथदर्शी प्रकल्प जिल्ह्यात राबवण्याबाबतही त्या सकारात्मक असून, “जिल्ह्याला लाभ होईल असे प्रकल्प राबवले जातील,” असे त्यांनी नमूद केले. गौण खनिजांचा मुद्दा हा सर्वत्रच असल्याचे त्या म्हणाल्या. या संदर्भात ठोस उपाययोजना करण्यासाठी नियोजनबद्ध पावले उचलणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.