सावंतवाडी पोलिसांचे मटका जुगार अड्ड्यांवर छापे 

 

७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल : रोकड व अन्य मुद्देमाल ताब्यात 

 

सावंतवाडी : सावंतवाडी पोलिसांनी सोमवारी तालुक्यात चार ठिका छापे टाकून मटका जुगार चालवणाऱ्या अड्ड्यांचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण ७ आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून रोकड आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक आणि पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने स्थानिक गुन्हे शाखा आणि इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही संयुक्त कारवाई केली.

या कारवाईमध्ये, सांगेली येथील बाजारपेठेत संदीप सखाराम लाड (रा. सांगली गुरगुटवाडी) याला मुंबई मटका जुगाराचे आकडे मोबाईलवर घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्याकडून १,२५० रुपये आणि १० हजार रुपये किमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला. चौकशीत त्याने हे आकडे सावंतवाडी येथील बुकी सुनील आडीवरेकर याला पाठवत असल्याचे सांगितले. त्यामुळे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर मळेवाड येथील जकात नाक्याजवळ आनंद यशवंत नाईक (वय ६२, रा. मळेवाड नाईकवाडी) हा कल्याण मटका जुगाराचे आकडे घेत असताना मिळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून २,४३० रुपये जप्त केले.

त्याच ठिकाणी दुसऱ्या एका कारवाईत, महेश रमाकांत परब (वय ५२, रा. शिरोडा, ता. वेंगुर्ला) हा देखील मोबाईलवर कल्याण मटका जुगाराचे आकडे घेताना सापडला. त्याच्याकडून २,५२० रुपये आणि ७ हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला. त्याने हे आकडे सावंतवाडी येथील बुकी हनु देऊलकर याला पाठवत असल्याची कबुली दिली. त्यामुळे परब आणि देऊलकर यांच्यावरही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

दरम्यान, आरोंदा येथील मच्छी मार्केटजवळ अमोल प्रभाकर विर्नोडकर (वय ४८, रा. अरुंदा बाजारपेठ) हा कल्याण मटका जुगाराचे आकडे घेत असताना पकडला गेला. त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने हे आकडे गोव्यातील हरमल येथील बुकी राजेंद्र धर्माजी रेडकर याला पाठवत असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याच्याकडून ३४० रुपये जप्त केले आहेत. विर्नोडकर आणि रेडकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही सर्व कारवाई यशस्वी करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील, महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक, तसेच एएसआय परब, एएसआय अरवारी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पीएसआय भोसले, हवालदार खंडे व प्रकाश कदम यांच्या पथकाने विशेष परिश्रम घेतले. पोलिसांनी भविष्यातही अशा अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.