सावंतवाडी: तालुक्यातील सातार्डा ग्रामपंचायतीने 15व्या वित्त आयोगाच्या निधीचा वापर करून गावातील उपआरोग्य केंद्राला विविध अत्यावश्यक औषधे आणि आरोग्य किटचे वाटप केले आहे. गावातील आरोग्य सेवा अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने ग्रामपंचायतीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
सरपंच संदीप उर्फ बाळू प्रभू यांच्या हस्ते ही औषधे उपआरोग्य केंद्रातील डॉ. एमगेकर आणि आरोग्य सेविका दिपाली परब यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. या प्रसंगी बोलताना सरपंच प्रभू यांनी, ग्रामपंचायतीच्या या पुढाकारामुळे गावातील आरोग्य सेवा आणखी प्रभावी होईल, असा विश्वास व्यक्त केला.
या औषध वाटप कार्यक्रमात ग्रामसेवक कुणाल मस्के, माजी सरपंच उदय पारिपत्ते, ग्रामपंचायत सदस्य उत्कर्ष पेडणेकर, शर्मिला मांजरेकर, वासुदेव राऊळ, विनिता गोवेकर यांच्यासह सगुण गोवेकर, संतोष गोवेकर, संजय पवार, सोनू पवार, संतोष पवार, योगेश गोवेकर, अशोक जाधव आणि गावातील इतर प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
या उपक्रमामुळे सातार्डा गावातील नागरिकांना आरोग्य सुविधा मिळवताना मोठी मदत होणार आहे.











