पंचक्रोशी ग्रामविकास समितीच्या वतीने आ. सदाभाऊ खोत यांचा सत्कार

नेत्रावती एक्सप्रेसला राजापूर रोड येथे थांबा मंजूर

राजापूर (प्रतिनिधी): तालुक्यातील प्रवाशांच्या दीर्घकालीन मागणीसाठी केंद्रीय रेल्वे मंत्र्याकंडे पाठपुरावा करून आमदार सदाभाऊ खोत यांनी नेत्रावती एक्सप्रेसला राजापूर रोड येथे थांबा मंजूर करून दिल्याबद्दल त्यांचा मंत्रालय येथे भेट घेऊन पंचक्रोशी ग्रामविकास समिती, राजापूर (मुंबई) यांच्यावतीने सत्कार करण्यात आला.
राजापूर रोड येथे जनशताब्दी एक्सप्रेस आणि नेत्रावती एक्सप्रेसला थांबा देण्याबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रव्यवहार करून निवेदन देण्यात आले होते. सद्यस्थितीला तसेच प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा केल्याबद्दल आमदार सदाभाऊ खोत यांचे स्वीय सहाय्यक आणि पंचक्रोशी ग्रामविकास प्रशासकीय समिती प्रमुख आदिनाथ कपाळे यांचे देखील विशेष आभार मानण्यात आले.
दिवसेंदिवस प्रवाशांचे संख्या वाढत असताना राजापूर रोड या स्थानकावर मोजक्याच गाड्या थांबत होत्या. त्यामुळे सणासुदीच्या काळात देखील चाकरमान्यांची प्रचंड गैरसोय होत होती. या निर्णयामुळे स्थानिक प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यावेळी पंचक्रोशी ग्रामविकास समितीचे मुख्य सल्लागार अनिल भोवड, अध्यक्ष विश्वास राघव, कार्याध्यक्ष संतोष जोगळे, खजिनदार अनिल राऊत, प्रशासकीय समिती प्रमुख आदिनाथ कपाळे, सहखजिनदार सुशांत आडिवरेकर, समन्वयक समिती प्रमुख संतोष गोठणकर, फेसबुक मीडिया प्रमुख दिनेश कुडकर सदस्य उमेश हातणकर, सुरेंद्र भाताडे, एकनाथ शिवगण, प्रदीप तोस्कर, सचिन पांचाळ इत्यादी उपस्थित होते.