कणकवली : कॉलेजच्या ट्रॅडिशनल डे दिवशी मैत्रिणींसोबत उभ्या असलेल्या युवतीला मिठी मारून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी कणकवली न्यायालयाने सुनावलेली शिक्षा जिल्हा व सत्र न्यायालयाने कायम ठेवली आहे.
कलमठ येथील गितेश प्रदीप लोकरे या आरोपीने कणकवली न्यायालयाच्या निर्णयाविरोधात जिल्हा सत्र न्यायालयात अपील केले होते. मात्र जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधीर देशपांडे यांनी त्याचे अपील फेटाळून एक वर्ष सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड अशी शिक्षा कायम ठेवली.
ही घटना १४ जानेवारी २०१६ रोजी दुपारी सव्वा एका वाजता घडली होती. पीडित युवतीच्या तक्रारीनंतर कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ४ जानेवारी २०१७ रोजी कणकवली न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून शिक्षा सुनावली होती.
सरकारी पक्षाकडून अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांनी दोन्ही न्यायालयांत बाजू मांडत आरोपीला दोषी ठरवण्यात यश मिळवले.









