राजापूर (वार्ताहर): लोकांच्या दुःख ,वेदना आणि संवेदना यामधून काव्य स्फुरते असे प्रतिपादन डॉ.अनिल कांबळी येथे केले.
येथील रयत शिक्षण संस्थेच्या आबासाहेब मराठे महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या वांड:मय मंडळाचा उद्घाटन समारंभ अतिशय उत्साहात पार पडला. याप्रसंगी सुप्रसिद्ध कवी डॉ. अनिल कांबळी बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजाराम राठोड, कला विभागाचे उपप्राचार्य डॉ. संजय मेस्त्री, वांड:मय मंडळाचे चेअरमन प्रा. अभिमन्यू माळी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना डॉ. कांबळी म्हणाले की, कविता ही मातृभावनेने प्रसूत होणारी एक छोटी पण तितकीच प्रभावी कला आहे. ज्याप्रमाणे लहान मुलांच्या चेहऱ्यावरील निरागस हास्य असते त्याचप्रमाणे कविता देखील तितकीच निरागस आणि निष्पाप असते. कवितेची व्याख्या करत असताना त्यांनी अनेक प्रकारच्या विशेषणांचा वापर केला. कवी बनण्यासाठी किंवा कविता लिहिण्यासाठी विद्वत्तेची नव्हे तर मानवी मूल्यांवर श्रद्धा असलेल्या संवेदनशीलतेची आवश्यकता असल्याचे देखील प्रतिपादन केले. संत बहिणाबाई, संत मुक्ताई ,संत ज्ञानेश्वर यांसारख्या महानुभावांचा संदर्भ देत त्यांनी कविता म्हणजे नेमकं काय हे उपस्थितांसमोर उलगडून दाखविले. याप्रसंगी त्यांनी आपल्या काही स्वरचित काव्यांचे काव्य वाचन देखील केले.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ.राठोड यांनी देखील काव्य हे विजेसारखे असून त्यातील मर्म किंवा अर्थगर्भिता सर्वांनाच पकडता येत नाही असे म्हणत काव्य आणि कवींची महत्ता सांगितली. या वांड:मय मंडळ उद्घाटन प्रसंगी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा.अभिमन्यू माळी यांनी तर आभार प्रदर्शन प्राध्यापिका मंजुषा सूर्यवंशी यांनी केले. सुत्रसंचालन प्रा.अभिजीत शेवडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व सहकारी प्राध्यापक वृंद, कर्मचारी व सेवक यांनी परिश्रम घेतले.












