दै. प्रहार, प्रहार Digital चे आयोजन
प्रांजल आग्रे प्रथम
रत्नागिरी | प्रतिनिधी – दैनिक प्रहार आणि प्रहार डिजिटल यांच्या वतीने पहिल्यांदाच नवी संकल्पना म्हणून स्त्रित्वाचा सन्मान करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या’आली गौराई’ या गौरी सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. या स्पर्धेत लांजा तालुक्यातील आगरगाव येथील प्रांजल अजय आग्रे यांनी प्रथम क्रमांक पटकावला असून, त्यांना ₹ ५०००/- चे रोख बक्षीस घोषित झाले आहे.
स्त्रित्वाचा सन्मान करत त्यांच्या शक्तीची पूजा करण्यासाठी ‘आली गौराई’ या स्पर्धेचे गणेशोत्सवात आयोजन करण्यात आले होते. यंदा ही नवीनच संकल्पना होती. त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला. गौराईचा हा उत्सव साजरा करताना या स्पर्धेचा निकाल नवरात्र उत्सवाच्या पहिल्याच दिवशी घोषित करण्यात येणार होता. त्याप्रमाणे ‘गौरी आणि नारायणी’ सन्मान करत हा निकाल घोषित करण्यात आला आहे.
या स्पर्धेत रत्नागिरी तालुक्यातील गोळप नवेदरवाडी येथील सुतेज हरिश्चंद्र भाटकर यांनी द्वितीय क्रमांक पटकावला असून त्यांना ₹ ३०००/- चे बक्षीस जाहीर झाले आहे. तर तृतीय क्रमांकावर रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा येथील श्रेया सचिन देसाई यांनी बाजी मारली असून, त्यांना ₹ २०००/- चे रोख बक्षीस मिळणार आहे. लवकरच या सर्व विजेत्यांना बक्षीस वितरण केले जाणार आहे.
यात सहभागी स्पर्धकांनी गौरी सजावटीचे व्हिडिओ पाठवले होते. स्पर्धेतील विजेत्यांची निवड परंपरा, सामाजिक भान, पर्यावरणपूरक सजावट आणि वेगळेपणा या निकषांवर करण्यात आली. यासाठी दैनिक प्रहारचे कार्यकारी संपादक संतोष वायंगणकर, प्रहार digital चे वृत्त संपादक हेमंत कुलकर्णी, दै प्रहार रत्नागिरीचे आवृत्ती प्रमुख नरेंद्र मोहिते यांनी मार्गदर्शन केले. तर आकाशवाणी निवेदिका सौ. सोनाली सावंत यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.












