दोडामार्ग: नवरात्रौत्सवाचा फायदा घेत चोरट्यांनी दोडामार्ग बाजारपेठेतील दोन वडापावचे गाडे फोडून रोख रक्कम लंपास केली आहे. ही घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली असून, चोरट्यांनी एकूण २८ हजार रुपयांची रोकड चोरून नेली. याप्रकरणी दोडामार्ग पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नवरात्रोत्सवामुळे सर्वत्र गर्दीचा फायदा घेत भेडशी मार्गावरील लोकमान्य शाखेजवळील दोन वडापावच्या गाड्यांची कुलूपे तोडून चोरी करण्यात आली. यामध्ये साईश उद्धव हरमलकर यांच्या गाड्यातील १२ हजार रुपये आणि विठ्ठल बापू फाले यांच्या गाड्यातील १६ हजार रुपये असे एकूण २८ हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले.
याशिवाय, चोरट्यांनी दोडामार्ग येथील पिंपळेश्वर देवस्थानची दानपेटी फोडण्याचाही प्रयत्न केला, परंतु तो प्रयत्न अयशस्वी ठरला.
घटनेची माहिती मिळताच दोडामार्ग पोलिस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी आपल्या टीमसह घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.













