​यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजमध्ये ‘जागतिक फार्मासिस्ट दिन’ उत्साहात साजरा

​सावंतवाडी : यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी आणि सिंधुदुर्ग जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज २५ सप्टेंबर रोजी जागतिक फार्मासिस्ट दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावर्षीच्या “थिंक हेल्थ, थिंक फार्मासिस्ट” या जागतिक संकल्पनेवर आधारित विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
​या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, शशिकांत यादव उपस्थित होते. त्यांच्यासोबत भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले आणि जिल्हा केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आनंद रासम हे देखील उपस्थित होते.

​कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर स्थानिक फार्मासिस्ट व्यक्तींचा सत्कार करण्यात आला आणि ‘फार्मासिस्ट ऑफ द इयर’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या प्रसंगी एका विशेष स्मरणिकेचेही अनावरण करण्यात आले.

​या दिवसाचे औचित्य साधून फार्मसी विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये फार्मा लोगो, फार्मा घोषवाक्य, फार्मा पत्रके आणि फार्मा रांगोळी यांसारख्या स्पर्धांचा समावेश होता. या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. विजेत्या विद्यार्थ्यांना मुख्य कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.
​कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन समन्वयक प्रा.अंकिता नेवगी आणि प्रा.डॉ.प्रशांत माळी यांनी केले. या कार्यक्रमामुळे फार्मासिस्टच्या योगदानाची समाजात जाणीव निर्माण झाली, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.