माफी मागावी अन्यथा गुन्हा दाखल करणार!

मालवणची बदनामी करणाऱ्या ‘त्या’ व्यक्ती विरोधात पर्यटन व्यावसायिक आक्रमक…

मालवण | प्रतिनिधी : मालवणच्या पर्यटनाची व पर्यटन व्यावसायिकांची सोशल मीडियावरून करण्यात आलेल्या बदनामी प्रकरणी मालवणातील पर्यटन व्यावसायिक संतप्त बनले आहेत. आम्ही तीव्र निषेध करत असून संबंधित व्यक्तीने जाहीर माफी मागावी. मालवणच्या पर्यटनाची जर कोणी बदनामी करत असेल तर ते खपवून घेणार नाही. कायदेशीर कारवाई करणार. असा इशारा ज्येष्ठ पर्यटन व्यावसायिक दामोदर तोडणकर, अन्वेषा आचरेकर व पर्यटन व्यावसायिक यांनी पत्रकार परिषदेत दिला.

याप्रकरणी त्या संबंधीत व्यक्तीची सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात येणार असल्याचेही श्री. तोडणकर यांनी स्पष्ट केले.

एका व्यक्तीने मालवणच्या पर्यटनाची सोशल मीडियावरून बदनामी केल्याचे निदर्शनास येताच त्याचे तीव्र पडसाद पर्यटन व्यवसायिकांमध्ये उमटले. याबाबत मालवणातील पर्यटन व्यावसायिकांनी बंदर जेटी येथे पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. श्री. तोडणकर म्हणाले, ज्या संबंधित व्यक्तीने मालवणच्या पर्यटनाची जी बदनामी केली त्याचा आम्ही सर्व पर्यटन व्यावसायिक तीव्र निषेध करत आहोत. संबंधिताने जे आरोप केले आहेत ते बिनबुडाचे व खोडसाळ आहेत. जर त्याच्याकडे याबाबतचे पुरावे असल्यास त्याने ते सादर करावेत अन्यथा मालवणातील पर्यटन व्यावसायिकांची जाहीर मागावी. पर्यटन व्यवसाय वाढविण्यासाठी आम्ही बरीच वर्षे प्रयत्न केले आहेत. अशा परिस्थितीत जर खोटी माहिती पसरवून येथील पर्यटनाची नाहक बदनामी करत असेल तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही. आम्ही याबाबत पोलीस ठाण्यात संबधित व्यक्तीवर कठोर कारवाई व्हावी यासाठी तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पर्यटन व्यावसायिक अन्वेशा आचरेकर म्हणाल्या आम्ही सर्व पर्यटन व्यावसायिकांनी पर्यटन वाढण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. आम्ही आमचा व्यवसाय प्रामाणिकपणे करत आहोत. अशा परिस्थितीत जर कोणी मालवणच्या पर्यटनाची बदनामी करत असेल ते आम्ही खपवून घेणार नाही. याबाबत आम्ही पोलीस निरीक्षकांचे लक्ष वेधले आहोत. संबंधीत व्यक्ती विरोधात कोयदेशीर कारवाई बाबत भुमिका घेतली जाणार आहे असेही त्यांनी सांगितले.

यावेळी फ्रान्सिस फर्नांडिस, अन्वय प्रभू, आबा शिर्सेकर, योगेश मेस्त्री, मनोज मेथर, एजाज मुल्ला, विनायक परब, रोहन आचरेकर, अमोल सावंत,f जॉन्सन रॉड्रिक्स, नूतन रोगे, विशाल गोवेकर, किरण हुर्णेकर, महेश कोयंडे, गोविंद धुरी, हेमंत रामाडे, रोहित मेथर यांच्यासह अन्य पर्यटन व्यावसायिक उपस्थित होते.