मुलांमध्ये गैरसमज पसरविण्याचा काही जणांचा प्रयत्न
समन्वयक म्हणून काम करणार : प्रकल्पाला गती देणार
सावंतवाडी । प्रतिनिधी :
जर्मनी येथे नोकरी देण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने तेथील बेडन युटनबर्ग राज्याशी केलेला करार आदर्शवत होता. परंतु सध्या हा प्रकल्प रेंगाळणे हे महाराष्ट्राच्या दृष्टीने योग्य नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः यामध्ये लक्ष घातले असून या योजनेला गती देण्यासाठी मला समन्वयक म्हणून जबाबदारी स्वीकारण्यास सांगितली आहे. त्याला अधिकृत संमती मिळताच या योजनेला गती मिळणार आहे, या ठिकाणी कोणाच्या फसवणुकीचा प्रश्नच येत नाही. मात्र, विद्यार्थ्यांना दिलेली संमतीपत्र खोटी असल्याचा चुकीचा आरोप होत असून त्याच्या मनात गैरसमज पसरविला जात असल्याचे आमदार दीपक केसरकर यांनी आज येथे सांगितले.
जर्मन येथे नोकरी देण्यासंदर्भात झालेल्या आरोपाबाबत आमदार दीपक केसरकर यांनी आज आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब, तालुकाप्रमुख दिनेश गावडे, शहर प्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
ते म्हणाले, जर्मन येथे नोकरी देण्यासंदर्भात शासनाने तेथील राज्याशी केलेला करार हा एक पायलट प्रोजेक्ट होता. सावंतवाडी तालुक्यात दोन ठिकाणी त्या संदर्भातील शिक्षण सुरू होते. या ठिकाणी जाण्यासाठी ए वन आणि ए टू अशा दोन परीक्षा देऊन त्या उत्तीर्ण होणे गरजेचे होते. काही विद्यार्थी ए वन परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले मात्र एटू परीक्षेमध्ये काहीजण नापास झाले त्यामुळे जर्मनीमध्ये जाण्यासाठी त्यांना व्हिजा मिळाला नाही. ही वस्तुस्थिती आहे.
ज्यांना नियुक्तीपत्र देण्यात आली त्या संदर्भात संबंधित जर्मनी देशातील संबंधितांशी खात्री केलेली आहे. त्यामुळे कुठल्याही विद्यार्थ्यांना फसवण्याचा या ठिकाणी प्रश्नच उद्भवत नाही. परंतु काहींनी याबाबत विद्यार्थ्यांच्या मनात गैरसमज निर्माण केलेला आहे. ज्यावेळी आपण शिक्षण मंत्री म्हणून त्या खुर्चीवर होतो त्यावेळी या प्रकल्पाला गती दिली होती. परंतु सद्यस्थितीत हा प्रकल्प काहीसा रखडला आहे, मात्र त्यामध्ये पुन्हा एकदा लक्ष देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला समन्वयक म्हणून जबाबदारी स्वीकारण्याची विनंती केली आहे. तशा प्रकारचे संमतीपत्र माझ्याकडून शासनाला देण्यात आले आहे. त्याला अधिकृत मान्यता मिळताच आपण यामध्ये पुन्हा एकदा लक्ष घालून या प्रकल्पाला गती देणार आहे. त्यामुळ कोणाच्याही मनात शंका असल्यास त्यांनी मला जरूर भेटावे त्यासाठी मी त्यांना वेळ देईन. मुलांची बाजू समजून घेऊन त्यांचे गैरसमजही दूर केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले, दोडामार्ग तालुक्यात थैमान घालणाऱ्या हत्तीमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान थांबावे यासाठी त्यांना वनितारामध्ये पाठवण्यासंदर्भात आमचा प्रयत्न आहे, त्या ठिकाणी हत्ती पाठवला म्हणजे तो विकला जातो असे विरोधकांची टीका निंदनीय आहे.
‘वनतारा’मध्ये हत्तींची योग्य ती काळजी घेतली जाते असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. प्राण्यांना पकडण्यासाठीची योजना त्यांच्याकडे आहे हे समोर आले आहे.
हत्तीबाधीत शेतकऱ्यांचं दुःख मी समजू शकतो. त्या हत्तींना हाताळण्यासाठीची यंत्रणा आपल्याकडे नाही. अन्यथा, पर्यटन वाढीसाठी हत्ती इथे ठेवले असते. केवळ शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी आमचा तसा प्रयत्न आहे. दुसरीकडे गोवा राज्य ओमकार हत्तीला गडचिरोली ला सोडण्यासंदर्भात पावले उचलली आहेत हे चांगलंच आहे, त्याला माझा विरोध नाही. याआधी आम्ही सुद्धा तशा प्रकारचा प्रयत्न कर्नाटक सरकारसोबत केला होता परंतु कर्नाटक सरकार येथील हत्तींना पुन्हा आपल्याकडे घेण्यास तयार झाले नाही, गोव्याने तसा प्रस्ताव पाठविला तर आनंद आहे. शेतकऱ्यांना त्रास होऊ नये हीच भूमिका आहे, असे ते म्हणाले.
तर अंमली पदार्थांच्या बाबतीत विचारले असता ते म्हणाले, अंमली पदार्थ सर्वात वाईट असून यामुळे पिढी बरबाद होत आहे. त्यामुळे यावर कारवाई होण्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक तसेच पोलिस निरीक्षकांशी मी बोललो आहे. यापूर्वीही तशी मागणी मी केली होती. या गोष्टी जिल्ह्यात येऊ नयेत यासाठी कारवाई केली जाईल, तरच पुढची पिढी व्यसनाधीन होणार नाही, असे मत आ. दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. दरम्यान, शहरातली खड्डे तात्काळ बुजविण्यासाठी प्रशासनाला सांगेन. इतर ठिकाणापेक्षा आपल्याकडे चांगली परिस्थिती असल्याचे त्यांनी सांगितले.












