उत्पादकांच्या चुकीचे खापर हे केमिस्ट वर फोडू नये – महाराष्ट्र स्टेट केमिस्ट ड्रगीस्ट असोसिएशन

मंडणगड : प्रतिनिधी, – मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये 20 मुलांचा दुषित खोकल्याच्या सिरपमुळे मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कठोर पावले उचलणे गरजेचे आहे. ऑनलाईन पद्धतीने फार्मसीतून बेकायदेशीरपणे औषधांची विक्री होत असून, उत्पादकांच्या चुकीचे खापर हे केमिस्ट वर फोडले जात आहे. त्यासाठी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाकडून किरकोळ केमिस्टना अन्यायाने लक्ष केले जात असून उत्पादकांचे चुकीचे खापर हे केमिस्टवर फोडू नये असे महाराष्ट्र स्टेट केमिस्ट ड्रगीस्ट असोसिएशनने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. यासंदर्भात जिल्हा केमिस्ट अँड ड्रगीस्ट असोसियशनचे सरचिटणीस वैभव कोकाटे यांनी नुकतीच माध्यमांना हि माहिती दिली.
प्रसिद्धी पत्रकात दिलेल्या माहितीनुसार, ऑनलाईन फार्मसी मध्ये बेकायदेशीरपणे औषधांची विक्री होत असून काही डॉक्टरांकडे बेकायदेशीर रित्या औषधांचा साठा आढळून येतो, त्यावर अन्न व औषध प्रशासन कोणतीही कारवाई करताना दिसत नाही. केमिस्ट आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना औषधांचा पुरवठा करून सहाय्य करतात. मात्र राज्यात किरकोळ केमिस्टना विनाकारण कारवाईचे लक्ष केले जात आहे. हि बाब राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने बंद करणे गरजेचे आहे. असे प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
याबाबत रत्नागिरी जिल्ह्यातील केमिस्ट संघटने प्रशासनाकडे अन्न व औषध प्रशासनाची हि अन्यायकारक कारवाई त्वरित थांबवण्याची मागणी केली असल्याची माहिती यावेळी असोसियशनचे जिल्हा सरचिटणीस श्री. वैभव कोकाटे यांनी माध्यमांना दिली आहे.