कर्तव्याबरोबर करुणेची जोड… चिपळूण पोलिसांचा आदर्श संवेदनशीलतेचा प्रत्यय

चिपळूण (प्रतिनिधी) : मंगळवारी, दि. १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी चिपळूण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या आदेशानुसार पोलिसांचे शहरात पायी पेट्रोलिंग सुरू होते. पोलीस हेडकॉन्स्टेबल संतोष शिंदे, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रितेश शिंदे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अभी सकपाळ, पोलीस कॉन्स्टेबल किरण केदार पेट्रोलिंग करत चिंचनाका येथे आले असता, त्यावेळी त्या परिसरात एक वयोवृद्ध इसम हताश अवस्थेत रस्त्याकडेला बसलेला दिसला. पोलीस हेडकॉन्स्टेबल संतोष शिंदे यांनी जवळ जाऊन विचारपूस केली असता त्या इसमाने दोन रुपयांची मदत मागितली. परंतु पैशांपेक्षा माणुसकीचा हात पुढे करत संतोष शिंदे यांनी त्याला दोन बिस्किटाचे पुडे आणि बिसलेरी पाण्याची बाटली आणून दिली. थोड्याच वेळात पोलीस कॉन्स्टेबल प्रितेश शिंदे यांनीही भाजी-चपाती देऊन त्या वृद्धाचे पोट भरले. संतोष शिंदे यांनी विश्वासात घेऊन अधिक विचारपूस केली असता त्याचे नाव अशोक सुबराव दायिंगडे (वय ७०, रा. कोळेगाव, ता. मोहोळ, जि. सोलापूर) असे समजले. तो घरातून रागाने बाहेर पडून सुमारे वर्षभर भटकंती करत असल्याचे त्याने सांगितले. संतोष शिंदे यांनी त्वरित वरिष्ठांना कळवून त्या इसमास पोलीस स्टेशनमध्ये आणले. डी.वाय.एस.पी. बेले व पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोळेगाव येथील पोलीस पाटील व त्या इसमाच्या मुलाशी संपर्क साधण्यात आला. नाईट ड्युटीला असलेल्या महिला पोलीस हवालदार प्रणाली शिंदे व पोलीस कॉन्स्टेबल माने यांनी त्या इसमास काळजीपूर्वक देखरेखीखाली ठेवले. दुसऱ्या दिवशी मुलगा उमेश अशोक दायिंगडे पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर सर्व कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करून त्याच्या वडिलांना सुरक्षितपणे त्यांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेतून पोलीस हेडकॉन्स्टेबल संतोष शिंदे यांची जिज्ञासू वृत्ती, तत्परता आणि मानवी संवेदनशीलता अधोरेखित होते. कर्तव्य पार पाडताना त्यांनी दाखवलेली माणुसकी ही संपूर्ण पोलीस दलासाठी प्रेरणादायी आहे. “संवेदनशीलता हीच खरी सेवा, चिपळूण पोलिसांचा हृदयस्पर्शी आदर्श!”