पर्यटकांच्या कारची वीज खांबाला धडक

वीज खांब तुटून कारवर कोसळला 

तारकर्ली येथील घटनेत कारमधील पर्यटक सुदैवाने बचावले

मालवण | प्रतिनिधी : देवबाग येथून मालवणच्या दिशेने येणाऱ्या पर्यटकांच्या कारची तारकर्ली सुतारवाडी येथील रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंटच्या वीज खांबाला जोरदार धडक बसली. या अपघातात वीज खांब तुटून कारवर कोसळला. सुदैवाने या अपघातात कारमधील कोणीही जखमी झाले नाही. मात्र वीज पोल कोसळून व वीज तारा तुटून वीज वितरणचे नुकसान झाले. तर कारच्या दर्शनी भागाचे ही मोठे नुकसान झाले आहे. हा अपघात रविवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडला.

 

मिळालेल्या माहितीनुसार मुंबईहून मालवणात पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांची वॅगनार कार देवबाग येथून मालवणच्या दिशेने जात असताना तारकर्ली सुतारवाडी येथे साई मंदिर मार्गावर रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंटच्या वीज खांब ला धडकली. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचे बोलले जात होते. या जोरदार धडकेत वीज खांब मुळातून तुटून कारच्या दर्शनी भागावर कोसळला. यामुळे गाडीची पुढील काच फुटून गेली तसेच दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले. या कारमधून प्रवास करणारे चार पर्यटक सुदैवाने बचावले. यावेळी स्थानिकांनी धाव घेत पर्यटकांना गाडीच्या बाहेर काढले.

 

वीज खांब कोसळून वीज वाहिन्याही तुटल्या. परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला होता. वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दखल झाले. वीज कर्मचारी व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने वीज पोल हटवून कार टोचन वाहनाच्या मदतीने रस्त्यावरून बाजूला करण्यात आली. या दरम्यान तारकर्ली रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली. स्थानिकांनी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी अथक मेहनत घेतली. कार बाजूला नेल्या नंतर मार्ग पूर्ववत झाला.