रत्नागिरी :
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ला.प्र.वि.), रत्नागिरी घटकाकडून दक्षता जनजागृती सप्ताह २०२५ च्या निमित्ताने दिनांक २७/१०/२०२५ ते ०२/११/२०२५ या कालावधीत भ्रष्टाचाराविरुद्ध व्यापक जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. या सप्ताहाचा एक भाग म्हणून, आज दिनांक २९/१०/२०२५ रोजी चिपळूण बसस्थानक, चिपळूण पोलीस ठाणे, पोलीस ठाणे खेड आणि पोलीस ठाणे मंडणगड येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना माहिती देण्यात आली.
तसेच तहसीलदार कार्यालय खेड आणि पंचायत समिती कार्यालय खेड येथील नागरिकांनाही भ्रष्टाचार निर्मूलनाबाबत माहिती देऊन पत्रके वाटण्यात आली. जनजागृती वाढवण्यासाठी ठिकठिकाणी दर्शनी ठिकाणी भिंतीपत्रके लावण्यात आली. याव्यतिरिक्त, नगरपरिषद कार्यालय खेड आणि तहसीलदार कार्यालय मंडणगड येथे भ्रष्टाचार निर्मूलनाबाबत विशेष बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या. या बैठकांमध्ये पोलीस उप अधीक्षक श्री. पाटील आणि पोलीस निरीक्षक श्री. जाधव यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचारी वर्गाला भ्रष्टाचाराच्या निर्मूलनासंबंधी सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले. विशेषतः खेड येथील रिक्षा स्टॅण्डवर उपस्थित चालक/मालक तसेच नागरिकांना लाचखोर अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांविरुद्ध ला.प्र. विभागाकडे तक्रार देण्याचे आवाहन करण्यात आले. या सप्ताहात स्थानिक वृत्तपत्रे, आर. के. केबल नेटवर्क आणि आकाशवाणी केंद्राद्वारे भ्रष्टाचाराविरुद्ध संदेश प्रसारित करण्यात आले, तसेच स्थानिक वृत्तपत्रांसोबत ला.प्र. विभागाची पत्रकेही वाटण्यात आली.
सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सॲप ग्रुपवर भ्रष्टाचारविरोधी जनजागृती संदेश मोठ्या प्रमाणावर प्रसारित करण्यात आले असून, तक्रारींसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरीचा फोन नं. ०२३५२ २२२८९३ आणि टोल फ्री क्रमांक १०६४ या क्रमांकांची माहिती दिली जात आहे. कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने खाजगी व्यक्तीने शासकीय कामासाठी लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक श्री. अविनाश पाटील (मो. क्र. ७५८८९४१२४७), पोलीस निरीक्षक श्री. मच्छिंद्र जाधव (मो. क्र. ९८७०४७४५३५) आणि पोलीस निरीक्षक श्री. सुहास रोकडे (मो. क्र. ९०६७०३५९१०) यांनी केले आहे.












