ओंकार हत्तीला नैसर्गिक अधिवासात सोडा
प्रांताधिकाऱ्यांना लेखी निवेदन
बांदा : प्रतिनिधी
सावंतवाडी तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून ठाण मांडून असलेल्या ओंकार हत्तीला तातडीने नैसर्गिक अधिवासात सोडावे. हत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई त्वरित मिळावी. तसेच गोव्याच्या धर्तीवर अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या भातपीक उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ४० हजार रुपये भरपाई द्यावी, या प्रमुख मागण्यांसाठी मडूरा पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी सावंतवाडी प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदन सादर केले.
*हत्तीला नैसर्गिक अधिवासात सोडा*
निवेदनात नमूद केल्यानुसार, गेल्या दोन महिन्यांपासून ओंकार हत्ती हा कास, मडुरा, सातोसे, रोणापाल, इन्सुली, तांबुळी, भालावल, वाफोली, सरमळे भागात तळ ठोकून आहे. वनकर्मचारी व पोलीस कर्मचारी हत्तीला हुसकावण्यासाठी सुतळी बॉम्ब आणि लाठीचार्जचा वापर करत आहेत. यामुळे हत्ती बिथरला असून तो सैरभैर झाला आहे. त्यामुळे हत्तीला मानवी वस्तीतून सुरक्षितपणे त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्याची मागणी करण्यात आली आहे.
*हत्ती नुकसानी त्वरित अदा करा*
हत्तीने नुकसान केलेल्या भातपीक, नाचणी तसेच माड, पोफळी व अन्य बागायतीची पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई संबंधित शेतकऱ्यांना अदा करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
*नुकसान भरपाईत मोठी तफावत*
अवकाळी पावसामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने प्रती हेक्टरी ८ हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. लगतच्या गोवा राज्याने प्रती हेक्टरी ४० हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांना दिल्याचा उल्लेख केला आहे. महाराष्ट्र आणि गोवा यांच्या भरपाईत मोठी तफावत असल्याकडे लक्ष वेधले आहे.
शेतकऱ्यांनी कर्ज काढून शेती केलेली असताना बळीराजा संकटात आहे. त्यामुळे शेती नुकसानीची तातडीने दखल घेऊन गोव्याप्रमाणे भरपाई अदा करावी, अशी मागणी केली आहे.
*मुख्यमंत्र्यांपर्यंत मागणी पोहोचवा*
उपविभागीय अधिकाऱ्यांनी ही मागणी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवावी, अशी अपेक्षा निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. यावेळी रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे, कास सरपंच प्रवीण पंडित, निगुडे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे, मडूरा माजी उपसरपंच उल्हास परब, मडुरा माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश वालावलकर आदी उपस्थित होते.












