मात्र रमेश कदम आहेत ‘दैवत’
चिपळूण : नगर परिषद निवडणुकीत तिकीट वाटपाच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. ११ मध्ये नाराजीचे राजकारण चांगलेच चिघळले आहे. शरदचंद्र पवार गटाचे माजी नगरसेवक व प्रभागातील कार्यकर्त्यांमध्ये मजबूत पकड असलेले उद्योजक रमेश खळे यांना उमेदवारी नाकारल्याने खळे गटात असंतोष उसळला आहे. कांगणेवाडी परिसरातील तब्बल ४५० मतदारांचा कौल मिळवून ते निवडणूक लढविण्यास सज्ज होते. प्रतिष्ठित नागरिक विशाल निवाते, चांदिवडे गुरुजी, मोहन शेलार, रवी कांगणे, प्रकाश मोरे, अरुण वलावटे, अमोल वीर, वैभव निवाते यांसह अनेकांनी त्यांना उमेदवारीसाठी पाठिंबा दर्शवला होता. मात्र पक्षाने खळे यांच्या उमेदवारीकडे दुर्लक्ष करत फक्त आठ महिन्यांपूर्वी पक्षात दाखल झालेल्या नव्या सदस्यांना तिकीट देण्याचा निर्णय घेतल्याने परिस्थिती चिघळली.
याबाबत खळे यांनी थेट सवाल उपस्थित केला, “निष्ठावंतांना डावलून नवागतांना तिकीट देताना पार्लमेंटरी बोर्डाने कोणते निकष वापरले?” खळे यांनी याहूनही गंभीर आरोप केला की, “बोर्डामधील माझेच काही मित्र, मला मोठे होताना पाहवत नसल्याने माझा अर्ज मुद्दाम नाकारला. ही त्यांची दोस्तीची परतफेड आहे.” तरीदेखील त्यांनी पक्ष नेतृत्वावरील निष्ठा स्पष्ट करत सांगितले, “रमेश भाई कदम हेच आमचे दैवत. आम्ही त्यांच्यासोबत २५ वर्ष आहोत आणि पुढेही राहणार.” प्रभागात स्वतःचा जनसंपर्क भक्कम असल्याचे सांगताना खळे यांनी स्पष्ट केले की, त्यांनी नगरसेवक म्हणून भ्रष्टाचारमुक्त कामकाज केले असून, व्यवसायात स्थिर असल्यामुळे समाजकार्यात सातत्याने योगदान देत आहेत. गणेश मंदिर, साई मंदिर, जाखमाता मंदिर, विविध सामाजिक उपक्रमांत त्यांनी दिलेले योगदान मोठे असल्याचे त्यांनी नमूद केले. याच प्रभागातील होतकरू तरुण श्रीनाथ खेडेकर यालाही तिकीट नाकारण्यात आले आहे.
खळे म्हणाले, “आम्ही दोघेही निष्ठावंत असूनही, बाहेरून आलेल्यांना तिकीट देण्यात आले. हा आमच्यासाठी मोठा प्रश्न आहे.” या घडामोडींमुळे खळे यांच्या समर्थकांमध्ये अपेक्षाभंग आणि तीव्र नाराजी असून, भविष्यात स्वतंत्र भूमिका घेण्याचा स्पष्ट कल दिसतो आहे. “कांगणेवाडीमध्ये कोणाला प्रचारासाठी आमंत्रण द्यायचे आणि कोणाला नाही, याबाबत आमच्या बाजूने ठोस निर्णय झाला आहे. लवकरच त्याचे चित्र दिसेल,” असा त्यांच्या वक्तव्यातील इशारा लक्षणीय ठरला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ११ मधील निवडणूक अधिकच रंगतदार, संघर्षपूर्ण आणि बहुपेडी होण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत. आता खळे आणि खेडेकर कोणती नवीन भूमिका घेतात, समर्थक कोणत्या दिशेने पावले टाकतात, आणि पक्षातील अंतर्गत नाराजीचा अंतिम उमेदवारीवर कसा परिणाम होतो, याकडे संपूर्ण चिपळूणचे डोळे लागून राहिले आहेत.













