सावंतवाडीचे आराध्य दैवत श्री देव पाटेकरचा घेतला आशीर्वाद
मतदारांची भेट घेऊन समस्या जाणून घेत दिली सर्वांगीण विकासाची ग्वाही

सावंतवाडी । प्रतिनिधी : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीतील भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. श्रद्धा भोंसले आणि नगरसेवक उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ राजवाडा येथील श्री देव पाटेकर देवस्थानला श्रीफळ अर्पण करून करण्यात आला. सावंतवाडी शहरासाठी राजघराण्याने दिलेले योगदान व भाजपच्या माध्यमातून त्यांना मिळणारी सत्तेची जोड यातून सावंतवाडी शहराचा सर्वांगीण विकास साधला जाईल असा विश्वास यावेळी पालकमंत्री नितेश यांनी व्यक्त केला.
यावेळी भाजपचे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष युवराज लखमराजे भोंसले, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, जिल्हा परिषदच्या माजी सभापती शर्वाणी गावकर, भाजपा कायदा सेलचे जिल्हाध्यक्ष ॲड. सिद्धार्थ भांबुरे, शेखर गांवकर, माजी नगरसेवक उदय नाईक, दिपाली भालेकर, समृद्धी विर्नोडकर, खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रमोद गावडे, मधुकर देसाई, अमित परब, ॲड. संजू शिरोडकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सावंतवाडी शहरातील प्रभाग क्रमांक तीन व प्रभाग क्रमांक सात येथील मतदारांची भेट घेत पालकमंत्री नितेश राणे यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. देशातील व राज्यातील सर्व सत्तास्थाने आमच्याकडे आहेत त्यामुळे कोणतीही काळजी करू नका केवळ एक वेळ संधी द्या आमच्या उमेदवारांना मतरुपी आशीर्वाद द्या, पालकमंत्री या नात्याने तुमच्या सर्व समस्या दूर करून या शहराचा सर्वांगीण विकास करू अशी ग्वाही यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी मतदारांना दिली. उपस्थित मतदारांनीही आम्ही तुमच्या सोबतच आहोत असा विश्वास व्यक्त केला.












