निवृत्त शिक्षक यांचा जागीच मृत्यू
मद्यधुंद ट्रक चालकाला नागरिकांची बेदम मारहाण
प्रतिनिधी /रोहन कांबळे
कोल्हापुर : करवीर तालुक्यातील गडमुडशिंगी येथील महात काट्याजवळ कोल्हापूर–हुपरी रस्त्यावर मंगळवारी सायंकाळी ट्रक आणि मोटरसायकल यांचा भीषण अपघात झाला. या अपघातात इंगळी (ता. हातकणंगले) येथील बळवंत अनंत कुलकर्णी (वय ६८) जे एक निवृत्त शिक्षक असून त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी भारती बळवंत कुलकर्णी (वय ६३) या गंभीर जखमी असून त्यांच्यावर छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात (सीपीआर) उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार,
मंगळवारी सकाळी बळवंत कुलकर्णी हे पत्नीसमवेत आपल्या दुचाकीवर कोल्हापूर शहरातील पाहुण्यांकडे गेले होते. सायंकाळी परत जात असताना गडमुडशिंगी येथील महात काट्याजवळ पोहोचताच हुपरीकडे निघालेल्या भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत बळवंत कुलकर्णी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन ते जागीच ठार झाले. तर दुचाकी रस्त्याच्या कडेला बरेच अंतर ओढत नेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
धडक दिल्यानंतरही चालकाने ट्रक काही अंतरापर्यंत न थांबविता तसाच पुढे नेण्याचा प्रयत्न केल्याने परिसरातील नागरिक संतप्त झाले. जय प्रल्हाद तिप्पे (वय ३२, रा. गायकवाडी, निपाणी) असे ट्रकचालकाचे नाव असून तो अपघाताच्या वेळी मद्यधुंद अवस्थेत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. नागरिकांनी ट्रकचा वेध घेत तो थांबवून तिप्पे याला खाली उतरवले आणि त्याला चांगलाच चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले.












