सध्याची राजकीय व सामाजिक परिस्थिती पाहता, संविधानाचे आचरण व विचार करणे अत्यंत गरजेचे — संजय तांबे.
फोंडाघाट| कुमार नाडकर्णी — फोंडाघाट सिद्धार्थ नगर मधील नालंदा बुद्ध विहारात फोंडाघाट बौद्ध विकास मंडळ व भारतीय बौद्ध महासभा फोंडाघाट यांच्या संयुक्त विद्यमाने मंडळाचे अध्यक्ष आयु. जयंत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली देशाचा ७५ वा संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी धम्म वंदना व संविधानाची शपथ घेण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे सचिव आयु.प्रकाश जाधव यांनी केले.
या प्रसंगी बोलताना मंडळाचे माजी अध्यक्ष आयु.संजय तांबे म्हणजे की आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर देशाचा कारभार पाहण्यासाठी राज्य घटनेची आवश्यकता भासू लागली.तेंव्हा देशाचे भूतपूर्व पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरूंनी ही महत्वाची जबाबदारी खूप मोठ्या विश्वासाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर सोपवली. व त्यांना मसुदा समितीचे अध्यक्ष स्थान दिले. डॉ.आंबेडकरानी लोकमताचा आदर करत आपल्या बुध्दी चातुर्याच्या जोरावर व प्रकांड पांडित्याच्या जोरावर २वर्षे ११ महिने १८ दिवस अहोरात्र मेहनत घेऊन,त्यांनी भारतीय संविधान लिहिले. व ते दिनांक २६ नोव्हेंबर १९४९ या दिवशी देशाला बहाल केले. गेल्या ७५ वर्षां नंतरही हे संविधान केवळ देशातच नव्हे तर जगात महान ठरले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानाद्वारे देशातील सर्व स्तरातील स्री पुरुषांना त्यांचे मूलभूत अधिकार दिले व त्याच बरोबर त्यांच्या जबाबदारीचीही जाणीव करून दिली. आज देशाची जी सर्वांगीण प्रगती होत आहे त्याचे एकमेव कारण हे संविधान आहे. या संविधानातील या कायद्यांतील कलमांचा येथील प्रशासकीय व शासन व्यवस्थेने प्रामाणिकपणे लोकहितासाठी उपयोग केल्यास,देशाची सर्वांगीण प्रगती साधण्यासाठी सर्वार्थाने बळ मिळेल.याचा विचार आजची राजकीय व सामाजिक परिस्थिती पाहता संबंधितांनी.विचार करण्याची गरज आहे. या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष आयु.जयंत जाधव व सचिव आयु.प्रकाश जाधव यांनी सुध्दा आपले विचार मांडले. या प्रसंगी मिलिंद जाधव, प्रा.संतोष आखाडे,संतोष कदम व अन्य सर्व धम्म बंधू भगिनी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार मंडळाचे सचिव प्रकाश जाधव यांनी मानले.












