खेड (प्रतिनिधी) — खेड शहरातील महात्मा फुले नगर परिसरात राहणारा नीलांबर उर्फ बबलू चौगुले या तरुणाचा बुधवारी सायंकाळी संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून, हा मृत्यू नेमका अपघात आहे की घातपात याबाबत शहरात दिवसभर उलटसुलट चर्चा रंगल्या.
नीलांबर चौगुले हा व्यवसायाने डंपर चालक असून, त्याला मद्यपानाचे व्यसनही होते. मात्र समाजातील काही व्यक्तींशी झालेल्या वादातूनच हा मृत्यू ओढावला असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर होत आहे. खेड शहरात सध्या निवडणुकीचे वातावरण तापलेले असताना अशा घटनेमुळे नागरिकांमध्ये अधिकच प्रश्नचिन्हे निर्माण झाली आहेत. या घटनेची आकस्मित मृत्यूची नोंद खेड पोलीस स्थानकात करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. तथापि, नीलांबरचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, अपघात होता की यामागे कुणाचे षड्यंत्र दडले आहे, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. समाजातील संबंधित व्यक्ती कोण आहेत, त्यांच्या विरोधात प्रशासन कोणती भूमिका घेणार, आणि मयत तरुणाच्या कुटुंबाला न्याय मिळणार का, याविषयी नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.
खेड पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून, शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण समोर येईल. दरम्यान, या प्रकरणामुळे शहरात विविध तर्कवितर्कांना ऊत आला असून चौकशीचा निष्कर्ष काय येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.












