अभिवादन रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
वैभववाडी प्रतिनिधी
वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघ व माता रमाई महिला मंडळ वैभववाडी यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वैभववाडी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक भावनांमध्ये अभिवादन करण्यात आले. तसेच तालुक्यात सर्वत्र अभिवादन रॅली, भीम गीत गायनाच्या कार्यक्रमातून अभिवादन करण्यात आले.
तालुक्याचा मुख्य कार्यक्रम हा वैभववाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन येथे शुक्रवारी रात्री 12 वाजता सुरु करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला, तसेच थाई पॅगोडा येथील प्रतिमेला वैभववाडी पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. महामानवांच्या जयघोषाने परिसरातून सोडला. यावेळी पंचशीलवाटिकेमध्ये सामुदायिक त्रिसरण व पंचशील ग्रहण करण्यात आले. यावेळी तालुका संघाचे अध्यक्ष भास्कर जाधव, महिला मंडळाचे अध्यक्ष शारदा कांबळे, सचिव रविंद्र पवार, शरद कांबळे, प्रमोद जाधव, मंगेश कांबळे, अंकुश पवार, उत्तम पवार, ऋचा पवार यांच्यासह मोठ्या संख्येने तालुका संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
तर शनिवारी सकाळपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी येत होते. यावेळी भीम गीत गायनातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना तालुक्यातील गायकांनी अभिवादन केले. यावेळी भगवान कांबळे, शिवाजी पवार, राकेश जाधव, रमेश सपकाळ, चंद्रकांत जाधव, अर्जुन कदम, विलास तांबे, सुरेश जाधव, दिलीप पवार, प्रभाकर कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते. राज्य पनण महासंघाचे संचालक प्रमोद रावराणे, माजी बँक संचालक दिगंबर पाटील, महेश संसारे, प्रकाश पाटील, अतुल सरवटे, अवधूत नारकर प्राची तावडे, स्नेहलता चोरगे यांनी स्मारकात येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.













