दापोली, (विशेष प्रतिनिधी) :
दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या विजय क्रीडांगणावर ५०व्या कोकण परीक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धांचे भव्य आणि उत्साहवर्धक उद्घाटन मोठ्या दिमाखात पार पडले. या प्रतिष्ठित क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. मान्यवरांच्या उपस्थितीने उद्घाटन सोहळ्याला विशेष महत्त्व लाभले.
या स्पर्धांसाठी कोकण विभागातील सात जिल्ह्यांतील पोलिस दलातील शेकडो खेळाडू दापोलीत दाखल झाले असून परिसरात क्रीडा उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे. पालघर, मीरा-भाईंदर, ठाणे, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील पोलिस खेळाडू विविध क्रीडा प्रकारांमध्ये आपली उत्तम कामगिरी सादर करण्यासाठी सज्ज झाले आहेत. उद्घाटन सोहळा ८ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता पार पडला. स्पर्धांचा समारोप १३ डिसेंबर रोजी होणार असून अंतिम दिवशी विजेत्या खेळाडूंना पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे. पाच दिवस चालणाऱ्या या क्रीडा स्पर्धांत धावणे, खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉल यांसह अनेक क्रीडा प्रकारांचे रोमांचक सामने रंगणार असून प्रेक्षकांना क्रीडारसाची मेजवानी मिळणार आहे.
दापोलीने पोलिस क्रीडा स्पर्धांचे यजमानपद स्वीकारताच संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून कोकणातील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या खेळाडूंच्या उपस्थितीने क्रीडांगणावर सशक्त, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणाची निर्मिती झाली आहे.











