राज्यस्तरीय शूटिंगबॉल स्पर्धेत मणेराजुरी विजेता!

मसुरे| झुंजार पेडणेकर       :राष्ट्रीय मिल मजदुर संघ, मुंबई यांच्या विद्यमाने श्रमिक जिमखाना डिलाईल रोड मुंबई येथे झालेल्या राज्यस्तरीय शूटिंगबॉल स्पर्धेत युथ फाउंडेशन मनेराजुरी सांगली या संघाने टेंभुर्णी सोलापूर संघाचा अटीतटीच्या लढतीत पराभव करत विजेतेपद पटकावले. एकवीस संघानी स्पर्धेत सहभाग घेतला होता. मुंबई, ठाणे, रायगड, सोलापूर, सांगली, सातारा, खानापूर, टेंभुर्णी, मालेगाव, पुणे येथील चार संघ अशा संघाना निमंत्रित करण्यात आले होते.

मुंबई शूटिंगबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त मान्यतेने आयोजित केलेले या स्पर्धेमध्ये सर्व संघात राष्ट्रीय खेळाडूंचा भरणा होता. स्पर्धेचे उदघाटन राष्ट्रीय मिल मजदुर संघाचे अध्यक्ष आमदार सचिन भाऊ अहिर, मुंबई शूटिंगबॉल असोसिएशनचे अध्यक्ष माजि आमदार शाम सावंत आणि श्री शिवाजीराव भोसले, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कंझुमर फेडरेशन याच्या हस्ते झाले.

उपांत्य फेरीत युथ फाउंडेशन मनेराजुरी संघाने संजय भोसले प्रतिष्ठान माळशिरस या संघाचा तर टेंभुर्णी संघाने खानापूर या संघाचा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय मिल मजदुर संघाचे सर्व पदाधिकारी , मुंबई शूटिंग चे सर्व पदाधिकारी मंगेश भोसले, मिलिंद बिर्जे, कुमार वाईरकर, पांडुरंग सुतार, प्रदीप वाघ, चंद्रकांत पाटील यांनी विशेष सहकार्य केले; स्पर्धा निरीक्षक म्हणून प्रफुल्लकांत वाइरकर आणि स्पर्धा नियंत्रक म्हणून रत्नदीप रावराणे यांनी कार्यभार सांभाळला. स्पर्धा प्रमुख म्हणून माजी राष्ट्रीय खेळाडू अशोक चव्हाण यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पंच म्हणून विजय गोंधळी, चंद्रकांत नगरे, विजय वायदंडे यांनी आपली भूमिका चोख बजावली.

विजयी संघ युथ फाउंडेशन मधील अष्टपैलू संदेश घारे याला मालिकावीर तर पराभूत टेंभुर्णी संघातील अष्टपैलू नाना चौगुले यांना सर्वोत्कृष्ट शूटर म्हणून गौरविण्यात आले. उदघाटनाच्या भाषणात आमदार सचिन अहिर यांनी या खेळातील खेळाडूंनी राष्ट्रीय पातळीवर चांगला खेळ करून मुंबई, महाराष्ट्राचा नावलौकिक संपूर्ण देशभर न्यावा अशी इच्छा व्यक्त करून त्यासाठी राष्ट्रीय, अखिल भारतीय स्पर्धा भविष्यात आयोजित करण्यासाठी आयोजकांनी पुढे यावे असे मनोगत यावेळी व्यक्त केले.

स्पर्धा यशस्वी करण्यास संघाचे सरचिटणीस श्री गोविंदराव मोहिते, खजिनदर निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष बजरंग चव्हाण, सेक्रेटरी शिवाजी काळे, उपाध्यक्ष अण्णा शिर्सेकर, उपाध्यक्ष बजरंग चव्हाण, मधुकर घाडी यांनी सहकार्य केले. कामगार नेते श्री दिवाकर दळवी, राज्य सचिव श्री निखिल शेडगे, श्री राहुल साळवी, राजेश आंगणे तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडू मोहन पेडणेकर यांनी सभेस उपस्थित राहून मार्गदर्शन केले. स्पर्धा समारोप व पारितोषिक वितरण सुनीलभाऊ अहिर आणि सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते पार पडला.

मुंबई शूटिंगबॉल असोसिएशनचे अध्यक्ष माजि आमदार श्याम सावंत यांनी येणाऱ्या क्रीडावर्षात मुलुंड पश्चिम येथे आमदार चषक, तर भांडुप अध्यक्षीय चषक अशा राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला.

 

स्पर्धेचे आयोजन मुंबई शूटिंगबॉल असोसिएशनचे सरचिटणीस दीपक सावंत यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले, त्यांनी सांगितले की मुंबई शूटिंगबॉल असोसिएशन नेहमीच प्रगतशील राहिली आहे, मुंबईतून नवीन योजनांचा सुरुवात केली जाते; ज्यामध्ये स्पर्धा प्रवेश फी आगाऊ घेऊन संघनिश्चिती करणे, जिल्ह्याचा खेळाडू जिल्ह्यातच खेळावा; गत स्पर्धेचे सीडिंग देऊन स्पर्धेचे ड्रॉ लॉटरी पद्धतीने काढले जातात; स्पर्धा सकाळी लवकर सुरू करता यावी म्हणून रात्री निवास व्यवस्था करणे, स्पर्धा सकाळी दहा वाजता चालू करून रात्री दहा वाजेपर्यंत संपवली जाते असे महत्त्वाचे निर्णय मुंबईने यापूर्वीच घेतले आहेत. त्याची राज्यातही सुरवात व्हायला हवी, अशी इच्छा व्यक्त केली.