लहान मुलांच्या भांडणात मोठ्यांना संताप अनावर, थेट चाकुने हल्ला

एकाला पोलीस कोठडी

प्रतिनिधी /रोहन कांबळे

कोल्हापूर : लहान मुलांमधील भांडण कधीकधी टोकाला जाते आणि त्यामुळे मोठ्यांमध्ये वाद निर्माण होतात. अशीच घटना कोल्हापुरातील राजारामपुरी परिसरात घडली आहे. लहान मुलांमधील किरकोळ भांडणानंतर रक्तरंजित चाकू हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी संशयित तरुणाला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे.

राजारामपुरी परिसरात लहान मुलांच्या किरकोळ भांडणाचा राग वाढून मोठ्यांमध्ये वाद सुरू झाला. या वादातूनच चाकू हल्ला होऊन ३२ वर्षीय नागरिक गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी माजी नगरसेवक प्रदीप पोवार यांचे चिरंजीव धनराज प्रदीप पोवार (वय ४९, रा. १३ वी गल्ली, राजारामपुरी) याला राजारामपुरी पोलिसांनी अटक केली आहे. सोमवारी न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. जखमी यासीन जहांगीर मोमीन (वय ३२, रा. १२ वी गल्ली, राजारामपुरी) यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या गालावर खोल जखम झाल्याचे समजते.