रत्नागिरी | प्रतिनिधी
तायक्वांडो फेडरेशन ऑफ इंडिया आणि तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मान्यतेने आयोजित ‘सब ज्युनिअर अजिंक्यपद राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धा’ २६ ते २८ डिसेंबर या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे संपन्न होत आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी रत्नागिरीच्या गणराज क्लबची गुणी खेळाडू बरखा सर्फराज संदे हिची निवड झाली असून, ती ‘क्योरीगी’ प्रकारात रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
दिग्गजांकडून शुभेच्छांचा वर्षाव
बरखाच्या या यशाबद्दल रत्नागिरी जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. विजय शिंदे, पोलीस उपनिरीक्षक श्री. अभय तेली आणि सामाजिक कार्यकर्ते श्री. मुन्ना देसाई यांनी तिची भेट घेऊन तिला स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच नगराध्यक्षा सौ. शिल्पाताई सुर्वे, नगरसेविका सौ. पूजा पवार, श्री. सौरभ मलुष्टे यांनीही बरखाचे कौतुक केले आहे. ६०० हून अधिक खेळाडू सहभागी होणाऱ्या या राज्यस्तरीय स्पर्धेत बरखा जिल्ह्याचा नावलौकिक वाढवेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.
कुशल प्रशिक्षकांचे मार्गदर्शन
बरखाला आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि एशियन युनियन कोच श्री. प्रशांत मनोज मकवाना तसेच महिला प्रमुख प्रशिक्षक सौ. आराध्या प्रशांत मकवाना यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. गणराज क्लबने आजवर राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. बरखाच्या या प्रवासात तिचे आई-वडील आणि प्रशिक्षकांचा मोठा वाटा असून, क्लबच्या अध्यक्षा सौ. पूजा शेट्ये, उपाध्यक्ष साक्षी मयेकर, सचिव रंजना मोंडूला आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी तिचे अभिनंदन केले आहे.
क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांकडून प्रोत्साहन
तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पठारे, कोषाध्यक्ष व्यंकटेश कररा यांच्यासह जिल्हा संघटनेचे सचिव लक्ष्मण के., खजिनदार शशांक घडशी आणि ‘एस.आर.के.’चे प्रशिक्षक शाहरुख शेख यांनीही बरखाला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. कुडाळ येथील वासुदेव हॉलमध्ये होणाऱ्या या स्पर्धेकडे आता सर्व रत्नागिरीकरांचे लक्ष लागले आहे.













